पीटीआय, नवी दिल्ली
अमेरिकी प्रशासनाची धोरणात्मक अनिश्चितता आणि व्यापार निर्बंधांमुळे जागतिक पातळीवर अर्थव्यवस्था मंदावतील. परिणामी विद्यमान वर्षात भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपीचा दर ६.५ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांपर्यंत खालावेल, असा अंदाज मूडीज रेटिंग्जने मंगळवारी व्यक्त केला.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे दोन्ही देशांच्या मूळ जीडीपी वाढीच्या अंदाजांना संभाव्य धोका आहे. भू-राजकीय संकटामुळे गुंतवणूकदार आणि व्यवसायांसाठी खर्च वाढण्याची शक्यता आहे. कारण गुंतवणूक कुठे आणि कोणत्या क्षेत्रात करायाची अशा अनेक नवीन समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, असे मूडीजने म्हटले आहे.
मूडीजने २०२५ या कॅलेंडर वर्षासाठी भारताचा विकासदर अंदाज ६.३ टक्क्यांपर्यंत कमी केला, मात्र वर्ष २०२६ साठी तो पूर्वअंदाजित ६.५ टक्के पातळीवर कायम ठेवला आहे. तरी २०२४ मधील ६.७ टक्के वाढीच्या तुलनेत तो कमी आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर आणखी कमी केली जाण्याची शक्यता आहे, अशी अपेक्षा मूडीजने व्यक्त केली आहे. धोरणात्मक बदल आणि वाढती भू-राजकीय अनिश्चितता यामुळे वर्ष २०२५ आणि २०२६ मध्ये जागतिक विकासदराच्या अंदाजात तिने आणखी घट केली आहे. विशेषतः अमेरिका आणि चीन या सर्वात मोठ्या दोन अर्थव्यवस्थांचा विकासदर मंदावण्याची भीती आहे.
धोरणात्मक अनिश्चिततेचा परिणाम ग्राहक, व्यवसाय आणि आर्थिक क्रियाकलापांवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धामुळे जागतिक व्यापार आणि गुंतवणूक मंदावण्याची शक्यता आहे आणि त्याचे परिणाम संपूर्ण जी-२० देशांना भोगावे लागण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचा जीडीपी वाढीचा अंदाज वर्ष २०२५ मध्ये १.५ टक्क्यांवरून १ टक्के आणि २०२६ मध्ये २ टक्क्यांवरून १.८ टक्क्यांपर्यंत कमी केला गेला आहे. वर्ष २०२४ मध्ये २.८ टक्के वाढीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. तर चीनचा विकासदर २०२५ मध्ये ३.८ टक्के आणि २०२६ मध्ये ३.९ टक्के राहणे अपेक्षित आहे, जो २०२४ मधील ५ टक्क्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे.
अमेरिकेने चीन वगळता, इतर सर्व देशांवरील अतिरिक्त व्यापार शुल्काला विराम दिला आहे. मात्र येत्या काही महिन्यात बहुतांश देशांवर हे शुल्क लागू होणार आहे. व्यापार धोरणातील अनिश्चिततेबरोबरच भांडवली बाजारातील अस्थिरता आणि अनेक भौगोलिक क्षेत्रांमध्ये सतत राजकीय तणाव यांच्यामुळे देखील विकासदर मंदावणार आहे. अलिकडच्या काळात, आशिया खंडामध्ये भारत आणि पाकिस्तान आणि दक्षिण चीन समुद्रात चीन आणि फिलीपिन्स यांच्यात तणाव वाढला आहे. याबरोबर रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाला विराम मिळालेला नाही.
विकासदराला बाधा आणणारे घटक
– अमेरिकेचे अनिश्चित व्यापार धोरण
– भू-राजकीय अनिश्चितता
– भारत-पाकिस्तानमधील वाढत तणाव
– जागतिक अर्थव्यवस्थेचा खालावलेला विकासदर