पीटीआय, नवी दिल्ली

भारताचा विकासदर विद्यमान २०२३ कॅलेंडर वर्षात ५.५ टक्के राहील, असा आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘मूडीज’ने बुधवारी अंदाज वर्तवला. याआधी वर्तवलेल्या अंदाजात मूडीजने आता वाढ केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात भांडवली खर्चात करण्यात आलेली वाढ आणि अर्थव्यवस्थेत होत असलेली सुधारणा यामुळे विकासदराचा सुधारित वधारलेला अंदाज मूडीजने जाहीर केला आहे.

मूडीजने २०२३ साठी या आधी ४.८ टक्क्यांचा अंदाज वर्तवला होता. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. असे असले तरी २०२२ कॅलेंडर वर्षासाठीचा विकासदराचा अंदाज कमी करून तो ६.८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात तो ७ टक्के वर्तवण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचा विचार करता अर्थसंकल्पात पुढील आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी भांडवली खर्चासाठीची तरतूद वाढवून १० लाख कोटी रुपये करण्यात आली आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) तुलनेत ही तरतूद ३.३ टक्के आहे. मार्च २०२३ अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी ही तरतूद ७.५ लाख कोटी रुपये होती.