मुंबई : गत वर्षभरात घरांसाठी कर्जाच्या व्याजदरात लक्षणीय घट ही खऱ्या अर्थाने घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदवार्ता ठरली आहे. ‘नाईट फ्रँक इंडिया’च्या परवडणाऱ्या घरांच्या निर्देशांकावर बेतलेल्या ताज्या अहवालानुसार, मुंबई-पुण्यात घरे खरेदी आता परवडण्याजोगी ठरली आहे. मुंबई महानगराने तर ही पातळी करोना साथीच्या काळानंतर पहिल्यांदाच गाठली आहे.
विशिष्ट शहरातील घराच्या मासिक हप्त्यापोटी (ईएमआय) कुटुंबाच्या उत्पन्नाचा किती वाटा खर्च होतो, यावरून घरे परवडण्याची क्षमता मोजली जाते. यानुसार, मुंबईच्या स्थावर मालमत्ता बाजारातील घरे परवडण्याची क्षमता लक्षणीयरीत्या सुधारली आहे. येथे लोकांचे घरासाठी कर्जाचे हप्ते अर्थात ईएमआय ते उत्पन्न हे गुणोत्तर ४७ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. मुंबई महानगर क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच परवडण्याची क्षमता ५० टक्क्यांखाली येण्यामागे बँका आणि वित्तसंस्थांकडून गृह कर्जाच्या व्याजदरातील कपातीसह, परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांवरील भरही कारणीभूत ठरला आहे.
अहवालानुसार, देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये अहमदाबाद हे १८ टक्क्यांच्या गुणोत्तरासह देशातील सर्वात परवडणारी गृहनिर्माण बाजारपेठ ठरली आहे, त्यानंतर पुणे आणि कोलकाता २२ टक्क्यांच्या गुणोत्तरासह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मुंबईत हे गुणोत्तर लक्षणीय सुधारले असले, तर दिल्ली एनसीआर क्षेत्रात परवडण्याची क्षमता किंचित घटली आहे अर्थात तेथे किमतीतील चढ कायम असल्याचे अहवालात म्हटले आहे.
डिसेंबरच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांच्या कपातीसह, संपूर्ण वर्षभरात व्याजाचे दर तब्बल सव्वा टक्क्यांनी खाली आणले आहेत. या कपातीचे अनुकरण करत, अलिकडे अनेक बँकांनी त्यांचे घरांसाठी कर्जासह, विविध प्रकारच्या कर्जांवरील व्याजदर कमी केले आहेत. या मालिकेत युनियन बँक, एलआयसी हाऊसिंग फायनान्सने मंगळवारी त्याचे गृह कर्जाचे व्याजदर ७.१५ टक्के असे सर्वात कमी पातळीवर आणल्याची घोषणा केली.
त्या आधी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने १५ डिसेंबरपासून ७.२५ टक्के या सुधारीत दराने गृह कर्जाचे व्याजदर सुरू करणारी कपात केली आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि ॲक्सिस या खासगी क्षेत्रातील बड्या बँकांनी गृह कर्जाच्या व्याजदरात कपातीची घोषणा केली आहे.
युनियन बँक, एलआयसी हाऊसिंगची कपात
सरकारी मालकीच्या युनियन बँक ऑफ इंडियाने गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जासह निवडक कर्जांवरील व्याजदरात १६० आधार बिंदूपर्यंत कपात केली आहे. १८ डिसेंबरपासून लागू झालेल्या या सुधारीत दरांनुसार, युनियन बँकेचे गृह कर्जाचे व्याजदर आता ३० आधारबिंदूंनी (०.३० टक्के) कमी होऊन ७.१५ टक्क्यांवर आले आहे.
तर वाहन कर्जाचे दर ०.४० टक्क्यांनी कमी होऊन ७.५० टक्क्यांपासून सुरू झाले आहेत. वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात १६० आधार बिंदूंची (१.६ टक्के) अशी मोठी कपात करण्यात आली असून, त्यांचे व्याजदर आता ८.७५ टक्क्यांपासून सुरू होत आहेत. एलआयसी हाऊसिंग फायनान्सने नव्याने घेतल्या जाणाऱ्या गृह कर्जावरील व्याजदर ७.१५ टक्के अशा किफायती पातळीवर २२ डिसेंबरपासून आणले आहेत.
