Premium

मुंबई शेअर बाजाराचा ऐतिहासिक टप्पा, बाजार भांडवल ४ लाख कोटी डॉलरपुढे

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने चालू वर्षात आतापर्यंत ५,५४०.५२ अंशांची कमाई करत, ९.१० टक्के वाढ नोंदवली आहे.

Mumbai stock market, BSE, capitalization, 4 lakh crore dollars
मुंबई शेअर बाजाराचा ऐतिहासिक टप्पा, बाजार भांडवल ४ लाख कोटी डॉलरपुढे

मुंबई : देशातील आघाडीचा बाजारमंच असलेल्या मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) बुधवारी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. बाजारातील सर्व सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल पहिल्यांदाच ४ लाख कोटी डॉलरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले. असा टप्पा गाठणाऱ्या अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगच्या बाजारपेठांमध्ये आता ‘बीएसई’चा समावेश झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारच्या सत्रात बाजाराने सकारात्मक पातळीवरून कामकाजाला सुरुवात केली. परिणामी सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३,३३,२६,८८१ कोटी रुपयांवर पोहोचले, जे बुधवारच्या डॉलर-रुपयाच्या ८३.३१ या विनिमय दरानुसार जोखल्यास ४ लाख कोटी डॉलरपुढे नोंदवले गेले.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने चालू वर्षात आतापर्यंत ५,५४०.५२ अंशांची कमाई करत, ९.१० टक्के वाढ नोंदवली आहे. सेन्सेक्समधील सर्व ३० कंपन्यांचे बाजार भांडवल ५०.८१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. १५ सप्टेंबर रोजी सेन्सेक्सने ६७,९२७.२३ हे सर्वोच्च शिखर गाठले होते.

हेही वाचा… ‘टाटा टेक’च्या पदार्पणाकडे नजरा, सूचिबद्धतेआधीच टाटा मोटर्सचा ऐतिहासिक उच्चांक

वीस वर्षांत ३३ पटींनी विस्तार

मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात गेल्या २० वर्षांच्या कालावधीत ३३ पटींनी वाढ झाली आहे. वर्ष २००३ मध्ये मुंबई शेअर बाजाराचे मूल्य केवळ १० लाख कोटी रुपये होते. दरम्यान करोना महासाथीच्या काळात ते १०७ लाख कोटींपर्यंत घसरले होते. मात्र बाजाराने पुन्हा उसळी घेत बुधवारच्या सत्रात ३३३ लाख कोटी बाजार भांडवलाचा टप्पा गाठला आहे. यामध्ये मुख्यतः परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांचे मोठे योगदान आहे. करोनाकाळात म्हणजेच मार्च २०२० मध्ये बाजाराने नीचांकी पातळी गाठल्यानंतर परदेशी गुंतवणूकदारांनी देशांतर्गत भांडवली बाजारात दोन लाख कोटी ओतले आहेत, तर देशांतर्गत म्युच्युअल फंड घराण्यांनी ५ लाख कोटींची गुंतवणूक केली आहे.

गेल्या दोन वर्षांत भांडवली बाजारात एलआयसी, पेटीएम आणि झोमॅटोसारख्या कंपन्यांनी मोठ्या संख्येने बाजारात पदार्पण करून बाजार भांडवलात मोठी भर घातली आहे.

आतापर्यंतचा प्रवास कसा?

मुंबई शेअर बाजाराने सर्वप्रथम २८ मे २००७ रोजी १ लाख कोटी डॉलर बाजार भांडवलाचा टप्पा पार केला. १ लाख कोटी डॉलर ते १.५ लाख कोटी डॉलर बाजार भांडवलाचा टप्पा पार करण्यासाठी त्याला २,५६६ दिवस म्हणजेच सात वर्षांचा कालावधी लागला. अखेर ६ जून २०१४ रोजी ते १.५ लाख कोटी डॉलरवर पोहोचले. तर १० जुलै २०१७ रोजी ते २ लाख कोटी डॉलर झाले. १.५ लाख कोटी डॉलर ते २ लाख कोटी डॉलर बाजार भांडवलाचा टप्पा गाठण्यासाठी १,१३० दिवसांचा अवधी लागला. तिथून १६ डिसेंबर २०२० रोजी २.५ लाख कोटी डॉलर बाजार भांडवलाची पातळी सर केली. त्यासाठी १,२५५ दिवस लागले

बाजार भांडवलाचे महत्त्वाचे टप्पे :

  • २८ मे २००७ : १ लाख कोटी डॉलर
  • ६ जून २०१४ : १.५ लाख कोटी डॉलर
  • १० जुलै २०१७ : २ लाख कोटी डॉलर
  • १६ डिसेंबर २०२० : २.५ लाख कोटी डॉलर
  • २४ मे २०२१ : ३ लाख कोटी डॉलर
  • २९ नोव्हें. २०२३ : ४ लाख कोटी डॉलर

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai stock market capitalization crossed more than 4 lakh crore dollars print eco news asj

First published on: 30-11-2023 at 10:32 IST
Next Story
‘टाटा टेक’च्या पदार्पणाकडे नजरा, सूचिबद्धतेआधीच टाटा मोटर्सचा ऐतिहासिक उच्चांक