लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक कल आणि परकीय निधीचा अविरत प्रवाह यामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात तेजीवाल्यांचा जोर कायम आहे. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि आयटीसीच्या समभागात गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावल्याने निर्देशांकांना बळ मिळाले.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये २७३.६७ अंशांची (०.४२ टक्के) वाढ झाली आणि तो ६५,६१७.८४ वर स्थिरावला. दिवसभरात त्याने ५२६.४२ अंशांची भर घालत ६५,८७०.५९ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ८३.५० वधारून ( ०.४३ टक्के) १९,४३९.४० पातळीवर बंद झाला.

आणखी वाचा-फॉक्सकॉनची वेदांताशिवायच भारतात सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याची तयारी, प्लॅन ‘बी’ सज्ज!

देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदार आता पहिल्या तिमाहीच्या कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीच्या प्रतीक्षेत आहेत. बुधवारपासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापुढील आव्हाने कायम असून नफाक्षमता टिकवण्यावर त्यांचा अधिक भर राहणार आहे. चीन सरकरकडून विकासवेग टिकवून ठेवण्यासाठी देण्यात येत असलेले उत्तेजन आणि अमेरिकेतील महागाई दर नियंत्रणात राहण्याच्या आशेने बाजारात सकारात्मकता आहे. शिवाय भारतात देखील विद्यमान आर्थिक वर्षात कंपन्यांची कमाई चांगली राहण्याची आशा आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

आणखी वाचा-बँक कर्मचाऱ्यांना डिसेंबरपर्यंत वेतनवाढ? अर्थमंत्रालयाचे ‘आयबीए’ला नव्या करारासाठी वाटाघाटीचे निर्देश

सेन्सेक्समध्ये सन फार्मा, मारुती, टाटा मोटर्स, आयटीसी, नेस्ले, लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस, एशियन पेंट्स, टायटन, टेक महिंद्र, पॉवर ग्रिड आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांसह समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, एचसीएल टेक्नॉलॉजीज, स्टेट बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फिनसर्व्हच्या समभागात मात्र घसरण झाली.

सेन्सेक्स ६५,६१७.८४ २७३.६७ ( ०.४२ टक्के)

निफ्टी १९,४३९.४० ८३.५० ( ०.४३ टक्के)

डॉलर ८२.३६ -२३

तेल ७७.८३ ०.१८