मुंबई : म्युच्युअल फंड घराण्यांच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ऑक्टोबर महिन्याअखेरीस ७९.८७ लाख कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. मासिक आधारावर समभागसंलग्न (इक्विटी) फंडातील गुंतवणूक ओघ घसरूनही, एकूण मालमत्तेत ४.२६ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. सप्टेंबरअखेर म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता ७५.६१ लाख कोटी रुपये होते.

ऑक्टोबरमध्ये म्युच्युअल फंड योजनांमध्ये निव्वळ इक्विटी प्रवाह १९ टक्क्यांनी घसरून, २४,६९० कोटी रुपयांवर आला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात इक्विटी प्रवाह घसरत आला आहे. ऑगस्टमध्ये इक्विटी फंडातील गुंतवणूक २२ टक्क्यांनी घसरून ३३,४३० कोटी रुपयांवर आल्यानंतर सप्टेंबरमध्ये ती आणखी ९ टक्क्यांनी घसरून ३०,४२१ कोटी रुपयांपर्यंत खाली आली, अशी माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाने (अॅम्फी) मंगळवारी दिली. तरी ऑक्टोबर महिन्यात समभागसंलग्न अर्थात इक्विटी फंडांमधील एकूण एयूएम ३५.१६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे सप्टेंबर महिन्यातील ३३.७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होते.

भांडवली बाजारातील वाढीदरम्यान नफावसुलीमुळे म्युच्युअल फंडात विक्री अर्थात ‘रिडम्पशन’चे प्रमाण वाढल्याने इक्विटी फंडामध्ये ही घसरण झाली आहे, असे ‘ॲम्फी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एन. चालसानी म्हणाले. ऑक्टोबरमध्ये एकूण रिडम्पशन ३८,९२० कोटी रुपये होते, जे सप्टेंबर महिन्यात ३५,९८२ कोटी रुपये नोंदवले गेले होते.

लोकप्रिय आणि शिस्तशीर गुंतवणुकीचा मार्ग असलेल्या सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून २९,५२९ कोटी रुपये गुंतवणुकीचा ओघ आला आहे. सप्टेंबरमधील २९,६३१ कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून ही गुंतवणूक किंचित घसरली आहे. तथापि ‘एसआयपी’ एयूएम १६.२५ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे आणि आता एकूण उद्योगाच्या एयूएमच्या एक पंचमांशपेक्षा अधिक योगदान ‘एसआयपी’चे आहे.

स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स अर्थात ‘एसआयएफ’ म्हणजेच किमान १० लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक असलेल्या गुंतवणूक श्रेणीत ऑक्टोबरमध्ये फोलिओंची एकूण संख्या १०,२०० पेक्षा अधिक झाली आहे. त्यातील चार योजनांमध्ये २,००७ कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली असून एकूण ‘एसआयएफ’ एयूएम आता २,०१० कोटींवर पोहोचला आहे.

सोने-चांदी ईटीएफला पसंती

‘ॲम्फी’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सोन्याच्या किमतीतील तेजी बघता, गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडांमध्ये ऑक्टोबर महिन्यात ७,७४३ कोटी रुपयांची भर पडली. सप्टेंबरमध्ये विक्रमी ८,३६३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. या श्रेणीतील व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. चांदीच्या ईटीएफमध्येही ३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे आणि श्रेणीतील एयूएम आता ४२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

कोणत्या फंडात किती गुंतवणूक

‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, स्मॉल-कॅप फंडांमध्ये ३,४७६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, मिड-कॅप फंडांमध्ये ३,८०७ कोटी रुपये, फ्लेक्सी-कॅप फंडांमध्ये ८,९२९ कोटी रुपये आणि लार्ज-कॅप फंडांमध्ये ९७२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

सप्टेंबरमध्ये १.०१ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात डेट म्हणजेच रोखेसंलग्न फंडांमध्ये एकूण १.५९ लाख कोटी रुपये गुंतवणूक झाली. त्याच वेळी, लिक्विड फंडांमध्ये सर्वाधिक ८९,३७५ कोटी रुपये गुंतवणूक झाली, त्यानंतर २४,०५० कोटी रुपये ओव्हरनाईट फंड आणि १७,९१६ कोटी रुपये मनी मार्केट फंडांमध्ये झाली. हायब्रिड म्युच्युअल फंडांमध्ये १४,१५६ कोटी रुपये गुंतवणूक झाली, जी सप्टेंबरमध्ये ९,३९७ कोटी रुपये होती. मल्टी-ॲसेट अलोकेशन फंडमध्ये ५,३४४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी मागील महिन्यात ४,९८२ कोटी रुपये होती.

म्युच्युअल फंड फोलिओंच्या संख्येत वाढ

म्युच्युअल फंड फोलिओंची संख्या सप्टेंबरमधील २५.१९ कोटींवरून, ऑक्टोबरअखेर २५.६ कोटींवर पोहोचली आहे. त्यात महिनाभरात ४१ लाखांची भर पडली आहे. या कालावधीत, ओपन-एंडेड आणि सर्व श्रेणींमध्ये एकूण १८ नवीन योजना सुरू करण्यात आल्या, ज्यायोगे एकूण ६,०६२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची भर पडली. या महिन्यात एकूण एसआयपी खात्यांची संख्या ९.७३ कोटी आहे. ऑक्टोबर महिन्यात ६० लाख नवीन खाती जोडली गेली आणि ४५ लाख खाती बंद झाली आहेत.