मुंबई : म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’ची लोकप्रियता कायम असून सरलेल्या डिसेंबर महिन्यात त्यातून विक्रमी ३१,००० कोटी रुपयांचा ओघ आल्याचे म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना ‘ॲम्फी’ने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले.
जागतिक अनिश्चितता आणि भांडवली बाजारातील अस्थिरतेच्या काळात देखील गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील विश्वास अबाधित असल्याचे ‘एसआयपी’तील महिन्यागणिक वाढत्या ओघाने अधोरेखित केले आहे.
एकीकडे ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक वाढत असली तरी समभागसंलग्न (इक्विटी) म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक डिसेंबरमध्ये ६ टक्क्यांनी घसरून, २८,०५४ कोटी रुपयांपर्यंत खाली आली आहे. ‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, रोखेसंलग्न (डेट) योजनांमधून मोठ्या प्रमाणावर पैसे काढल्याच्या परिणामामुळे म्युच्युअल फंड घराण्यांकडील एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) नोव्हेंबरमधील ८०.८० लाख कोटी रुपयांवरून डिसेंबरमध्ये ८०.२३ लाख कोटी रुपये अशी किंचित घसरली आहे.
उद्योगाच्या ‘एयूएम’मधील ही घट प्रामुख्याने तरलता (लिक्विडिटी) व्यवस्थापनासाठी रोखेसंलग्न फंडातून काढून घेतलेल्या निधीमुळे आणि बाजाराशी संबंधित मूल्यांमधील मर्यादित बदलांमुळे झाली, असे ‘ॲम्फी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकट एन. चालसानी म्हणाले.
एकूणच, म्युच्युअल फंड उद्योगाने डिसेंबर महिन्यात ६६,५९१ कोटी रुपयांचा निव्वळ निर्गमन नोंदवले, जे प्रामुख्याने डेट योजनांमधून मोठ्या प्रमाणावर पैसे काढल्यामुळे झाले, तरीही ‘इक्विटी’ आणि ‘गोल्ड फंडां’नी गुंतवणूकदारांचे आकर्षण कायम ठेवले आहे.
आकडेवारी काय सांगते?
आकडेवारीनुसार, इक्विटी फंडातील गुंतवणूक नोव्हेंबरमधील २९,९११ कोटी रुपयांवरून, डिसेंबरमध्ये २८,०५४ कोटी रुपयांपर्यंत घटली असली, तरी ती ऑक्टोबरमधील २४,६९० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. बाजारातील अस्थिरतेतही ‘इक्विटी’मधील गुंतवणूक दमदार राहिली, ज्याला ‘एसआयपी’तील स्थिर योगदानाचा आणि देशाच्या दीर्घकालीन वाढीच्या दृष्टिकोनावरील आत्मविश्वासाचा सुपरिणाम दिसून आला. ‘एसआयपी’द्वारे किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग नोव्हेंबरमधील २९,४४५ कोटी रुपयांवरून डिसेंबरमध्ये ३१,००० कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला, जे शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीच्या धोरणांसाठी गुंतवणूकदारांची पसंती दर्शवते.
फ्लेक्सी-कॅप फंडात सर्वाधिक १०,०१९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, जी नोव्हेंबरमधील ८,१३५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, हे अनिश्चित बाजाराच्या परिस्थितीत त्यांची वाढती लोकप्रियता दर्शवते. त्यानंतर मिड-कॅप फंडात ४,१७६ कोटी, लार्ज अँड मिड-कॅप फंड ४,०९४ कोटी आणि स्मॉल-कॅप फंडामध्ये ३,८२४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. याशिवाय, लार्ज-कॅप फंडांनी १,५६७ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली.
याउलट, ईएलएसएस आणि डिव्हिडंड यील्ड फंडांनी अनुक्रमे ७१८ कोटी रुपये आणि २५४ कोटी रुपयांचा निव्वळ निर्गमन नोंदवले. तसेच, डेट म्युच्युअल फंडांमधून डिसेंबरमध्ये १.३२ लाख कोटी रुपयांचा मोठा निधी बाहेर काढण्यात आला.
गोल्ड ईटीएफचे वाढते आकर्षण
गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंड्समध्ये डिसेंबरमध्ये निव्वळ आवक वाढून ११,६४७ कोटी रुपये झाली, जी नोव्हेंबरमधील ३,७४२ कोटी रुपये आणि ऑक्टोबरमधील ७,७४३ कोटी रुपयांपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आहे. २०२५ या कॅलेंडर वर्षात सोन्याने ७० टक्क्यांहून अधिक परतावा दिल्यानंतर गोल्ड ईटीएफमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक आवक नोंदवली.
‘एसआयपी’तून ३.३४ लाख कोटींची भर
सरलेले कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये ‘एसआयपी’च्या माध्यमातून म्युहक्युअल फंडात एकूण ३.३४ लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. ‘एसआयपी’चे योगदान हे अल्प-मुदत गुंतवणूक दृष्टिकोनाऐवजी दीर्घकालीन गुंतवणूक हेतू आणि आत्मविश्वास दर्शवतो.
