Narayana Murthy’s Grandson Income: इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचा १७ महिन्यांचा नातू, एकाग्र रोहन मूर्ती याला मार्च २०२५ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या अंतिम लाभांशातून (डिव्हिडंट) ३.३ कोटी रुपये मिळणार आहेत. यामुळे आता एकाग्र मूर्ती भारतातील सर्वात लहान करोडपतींपैकी एक ठरणार आहे.

नोव्हेंबर २०२३ मध्ये बेंगळुरू येथे जन्मलेला एकाग्र हा रोहन मूर्ती आणि अपर्णा कृष्णन यांचा मुलगा आणि नारायण मूर्ती आणि राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांचा तिसरा नातू आहे. अक्षता मूर्ती आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांची कृष्णा आणि अनुष्का ही मुले मूर्ती दांपत्याची इतर दोन नातवंडे आहेत.

एकाग्रकडे सध्या इन्फोसिसचे १५ लाख शेअर्स आहेत. याचाच अर्थ त्याच्याकडे आयटी सेवा क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसची ०.०४ टक्के मालकी आहे. हे शेअर्स एकाग्रला त्याचे आजोबा नारायण मूर्ती यांनी तो फक्त चार महिन्यांचा असताना भेट म्हणून दिले होते. मार्च २०२४ मध्ये भेट म्हणून दिलेल्या या शेअर्सची किंमत २४० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती.

गुरुवार, १७ एप्रिल रोजी, इन्फोसिसने प्रति शेअर २२ रुपये अंतिम लाभांश जाहीर केला. एकाग्रचे १५ लाख शेअर्स पाहता, त्याला ३.३ कोटी रुपये इतका लाभांश मिळणार आहे. या नव्या लाभांशासह, चालू आर्थिक वर्षात एकाग्रला लाभांशाच्या माध्यमातून एकूण १०.६५ कोटी रुपये मिळाले आहेत. यापूर्वी वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने घोषित केलेल्या अंतरिम लाभांशाद्वारे एकाग्रला ७.३५ कोटी रुपये मिळाले होते.

दरम्यान इन्फोसिसिच्या या लाभांशासाठी पात्र शेअर होल्डर्स निश्चित करण्यासाठी ३० मे हा नोंदणी दिनांक निश्चित करण्यात आला असून, याचा लाभांश ३० जून रोजी दिला जाणार आहे. इन्फोसिसने त्यांच्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मूर्ती कुटुंबीयांनाही लाभांशातून मिळणार मोठी रक्कम

इन्फोसिसचे प्रमोटर असलेल्या मूर्ती कुटुंबातील इतर अनेक सदस्यांनाही या अंतिम लाभांशातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. यामध्ये नारायण मूर्ती यांना ३३.३ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे, तर त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना ७६ कोटी रुपये मिळतील. त्यांची मुलगी अक्षता मूर्ती, ज्यांच्याकडे ३.८९ लाख शेअर्स आहेत, त्यांना लाभांशाच्या माध्यमातून ८५.७१ कोटी रुपये मिळतील.