मुंबई : जागतिक पातळीवरील संमिश्र वातावरण, परकीय निधीचे निर्गमन आणि सलग तीन सत्रातील तेजीनंतर देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी नफावसुली केली. परिणामी गुरुवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ वाढीसह स्थिरावले. निफ्टीने गुरुवारच्या सत्रात २६,०१०.७० या ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. मात्र त्या पातळीवर टिकून राहता आले नाही.

दिवसभरातील अस्थिरतेनंतर, सेन्सेक्स १२.१६ अंशांनी वधारून ८४,४७८.६७ पातळीवर बंद झाला. सत्रादरम्यान, त्याने ८४,९१९.४३ चा उच्चांक आणि ८४,२५३.०५ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. निफ्टी केवळ ३.३५ अंशांनी वधारला आणि २५,८७९.१५ वर बंद झाला.

सेन्सेक्समध्ये एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रिड, लार्सन अँड टुब्रो, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, सन फार्मास्युटिकल्स, मारुती सुझुकी इंडिया, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचसीएल टेक्नॉलॉजीची कामगिरी समाधानकारक राहिली. तर दुसरीकडे, टाटा मोटर्सची व्यावसायिक वाहन शाखा, महिंद्र अँड महिंद्र, टाटा स्टील, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स, ट्रेंट, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि इन्फोसिसच्या समभागांनी निराशा केली.

देशांतर्गत पातळीवर आशावादी संकेत असूनही नफा-वसुलीने सुरुवातीचे तेजी कमी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी सरकारच्या टाळेबंदी (शटडाऊन) संपवण्यासाठी अल्पकालीन निधी विधेयकावर स्वाक्षरी केल्याने आणि भारतासाठी कर सवलतीची आशा बळावली आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यात महागाई विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचल्याने रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची अपेक्षा वाढली आहे, ज्यामुळे धातू आणि गृहनिर्माण क्षेत्रासारख्या दर-संवेदनशील क्षेत्रे गुंतवणूकदारांसाठी आकर्षक बनली आहेत, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले. मात्र परदेशी गुंतवणूकदारांच्या निधीचे बहिर्गमन, कमकुवत रुपया आणि बिहार निवडणुकीच्या निकालांपूर्वी नफा-वसुली दिसून आली, असेही ते पुढे म्हणाले.

सेन्सेक्स ८४,४७८.६७ १२.१६

निफ्टी २५,८७९.१५ ३.३५

तेल ६२.५३ -०.२९%

डॉलर ८८.६८ – ६ पैसे