पीटीआय, नवी दिल्ली : सुमारे १४० कोटी लोकसंख्येच्या देशाला ‘मृत अर्थव्यवस्था’ असे कसे कोण म्हणू शकतो? परदेशी लोक हे बोलू शकतील; परंतु आपल्याच देशातील लोकांनी तरी आपल्याच लोकांच्या प्रयत्नांना आणि कामगिरीला कधीही विरोध करू नये. असे म्हणणाऱ्यांच्या प्रभावाखाली न जाता, नागरिकांनी स्वतःवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवावा, असे आवाहन दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्यांपुढे बोलताना सीतारामन यांनी केले.

जगात सर्वात वेगवान अर्थव्यवस्था असलेला भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी व्यक्त केला.

दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की, भारत त्याच्या आर्थिक बळकटतेमुळे दृढ पायावर उभा आहे. वर्ष २०१४ मध्ये दहाव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपासून पाचव्या आणि चौथ्या क्रमांकावर मजल आणि आता लवकरच, तिसऱ्या क्रमांक गाठला जाण्याची आशा आहे. केंद्र सरकार २.५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यशस्वी झाले आहे. केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर, सीमाशुल्क आणि इतर नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी वेगाने काम सुरू केले आहे.

बँकिंग क्षेत्राबाबत, सीतारामन म्हणाल्या की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ताळेबंदामध्ये ७-८ वर्षांपूर्वी त्यांना भेडसावणाऱ्या दुहेरी ताळेबंदाच्या समस्येच्या तुलनेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तुटीचे ४.४ टक्क्यांचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य गाठेल. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या ४.४ टक्के किंवा १५.६९ लाख कोटी रुपयांवर राखण्याचे केंद्र सरकराचे उद्दिष्ट आहे.