मुंबई : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपये मूल्याची नोट चलनातून काढून घेण्याच्या घोषणेला एक वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरीही अजूनही ७,४०९ कोटी रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटा जमा परतलेल्या नाहीत आणि त्या लोकांहाती आहेत, अशी माहिती बँकेने गुरुवारी दिली.

गेल्यावर्षी १९ मे २०२३ रोजी रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली. त्यांनतर ३१ जुलै २०२४ अखेर ९७.९२ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्यात आल्या आहेत. चलनात असलेल्या दोन हजारांच्या नोटांचे एकूण मूल्य, १९ मे २०२३ रोजी ३.५६ लाख कोटी रुपये होते. रिझर्व्ह बँकेने ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत देशातील सर्व बँक शाखांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलण्याची सुविधा उपलब्ध केली होती.

हेही वाचा >>>इन्फोसिसला ३२,००० कोटी ‘जीएसटी’ भरण्याची नोटीस, जुलै २०१७ ते २०२२ कालावधीसाठी कर चुकवल्याचा आरोप

अजूनही संधी…

ज्या नागरिकांकडे अजूनही दोन हजार रुपयांच्या नोटा असतील, त्यांना मुंबई, नागपूरसह, अहमदाबाद, बेंगळूरु, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम अशा रिझर्व्ह बँकेच्या १९ कार्यालयांमध्ये नोटा जमा किंवा बदलून घेता येतील. शिवाय देशातील कोणत्याही टपाल कार्यालयातून दोन हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात पाठवणे शक्य आहे.