मुंबई : उद्योग पुनर्रचना, सरकारी धोरणांमध्ये किंवा नियमनांमधील बदल आणि त्या त्या क्षेत्रातील तात्पुरत्या आव्हानांवर आधारित संधी हेरणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या अपॉर्च्युनिटीज फंड श्रेणीतून पाच वर्षांत २७ टक्क्यांपर्यंत परतावा गुंतवणूकदारांनी मिळविला आहे. या योजनांसाठी बाजार भांडवलीकरणाच्या अपरोक्ष तसेच क्षेत्रीय निर्बंध न राखता बॉटम-अप धाटणीने निवडीचे धोरण वापरात येते.
उपलब्ध माहितीनुसार, फ्रँकलिन इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडाने पाच वर्षांत २०.६९ टक्के, सुंदरम सर्व्हिसेसने १९.०४ टक्के, तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अपॉर्च्युनिटीज फंडाने २७ टक्के परतावा दिला आहे. ही एक मुदतमुक्त समभागसंलग्न (इक्विटी) योजना आहे जी विशेष परिस्थितींच्या मध्यवर्ती संकल्पनेवर (थीम) चालते.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या योजनेने सात वर्षे पूर्ण केली आहेत. सात वर्षांपूर्वी योजनेत गुंतवलेले १० लाख रुपयांचे आता ३७.७६ लाख रुपये झाले आहेत, ज्याचा वार्षिक परतावा २१ टक्के आहे. योजनेच्या बेंचमार्क निफ्टी-५०० टीआरआयमध्ये २८ लाख रुपयांना (१५.९७ टक्के) गुंतवले गेले आहे.
जानेवारी २०१९ मध्ये सुरू झालेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या योजनेने एका वर्षात १३ टक्के, तीन वर्षात २३ टक्के आणि पाच वर्षात २७ टक्के परतावा दिला आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचे कार्यकारी संचालक एस. नरेन यांच्या मते, कंपन्या वेळोवेळी बाजारातील अस्थिरता आणि नियामक बदल अशा विशेष परिस्थितींना तोंड देत असतात. तथापि या क्षणांना हेरून दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी त्यांना संधींमध्ये रूपांतरित करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे. मात्र या प्रकारच्या गुंतवणुकीसाठी कंपनीची खरी क्षमता आणि संबंधित जोखीम दोन्ही समजून घेण्यासाठी सखोल संशोधन आवश्यक आहे.
अपॉर्च्युनिटीज फंडातील गुंतवणुकीतून दीर्घकालीन चांगला अल्फा निर्माण होऊ शकतो, परंतु अल्पावधीत अस्थिर असू शकतो. तेवढा संयम गुंतवणूकदारांनी दाखविणे आवश्यक असल्याचे नरेन यांनी आवर्जून सांगितले. अनिश्चिततेचा काळ अनेकदा अवाजवी फुगलेल्या किंमतीला ताळ्यावर आणून गुंतवणुकीची संधी निर्माण करत असतो, हे या योजनेमागील गुंतवणुकीचे तत्त्व आहे. या प्रकारच्या अनिश्चितता बाजारासाठी नवीन नसून, वैयक्तिक कंपनी, क्षेत्र किंवा अर्थव्यवस्थेच्या पातळीवर उद्भवतच असतात.
आर्थिक मंदी, नियामक बदल, भू-राजकीय घटना किंवा तात्पुरते व्यवसायातील अडथळे वगैरेंतून कंपन्यांच्या शेअरच्या मूल्यात अस्थिरता दिसून येते. ही योजना अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करते जिथे असे अडथळे तात्पुरते असतात आणि कंपनीची दीर्घकालीन मूलभूत तत्त्वे या अडथळ्यांना पार करण्याइतके मजबूत असतात.

