मुंबई: अस्थिर बाजाराच्या परिस्थितीत तरून जाण्यासाठी उपयुक्त गुंतवणूक पर्याय असलेल्या म्युच्युअल फंडाच्या ‘बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज योजनां’ची परतावा कामगिरीही सरस ठरली आहे. या योजनांनी एका वर्षात बँक ठेवी, पीपीएफ काय, गुंतवणुकीच्या अन्य सर्व पर्यायांपेक्षा आणि मानदंड निर्देशांकाच्या परताव्यालाही मात देणारी कामगिरी केली आहे. ॲक्सिस म्युच्युअल फंडाच्या बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंडाने एका वर्षात या म्युच्युअल फंड श्रेणीत सर्वोत्तम ३१ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजे या फंडात गुंतवलेल्या १०,००० रुपयांचे आज ३१,००० रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकमूल्य झाले आहे.

हेही वाचा >>> इक्विटी फंडात ऑगस्टमध्ये ३८,२३९ कोटींचा विक्रमी ओघ

ॲक्सिस बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंडाच्या तुलनेत त्याचा मानदंड निर्देशांक ‘निफ्टी ५० हायब्रिड कम्पोझिट’ने गत वर्षात केवळ १७.६८ टक्के परतावा दिला आहे. तीन वर्षांच्या कालावधीत फंडाचा चक्रवाढ परतावा १५ टक्क्यांहून अधिक आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, याच कालावधीत आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाच्या बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंडाने २५ टक्के, एसबीआय बॅलन्स्ड फंडाने २५ टक्के, कोटक बॅलन्स्ड फंडाने २४ टक्के आणि टाटा बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंडाने २३ टक्के परतावा दिला आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये सुरुवात झालेल्या आणि सध्या २,४६६ कोटी रुपये मालमत्ता असलेला हा फंड असून, ॲक्सिस म्युच्युअल फंडाचे समभाग विभागाचे निधी व्यवस्थापक जयेश सुंदर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ॲक्सिस बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडाची सध्या लार्ज कॅपमध्ये ७७.६ टक्के, मिडकॅपमध्ये १३.१ टक्के आणि स्मॉल कॅपमध्ये ९.४ टक्के गुंतवणूक आहे. शीर्ष १० क्षेत्रातील गुंतवणूक पाहिल्यास यात वित्तीय सेवा, आयटी, आरोग्यसेवा, तेल व वायू, वाहन उद्योग आणि पूरक घटक, ग्राहकोपयोगी उत्पादने, भांडवली वस्तू, रसायने आदींचा समावेश आहे.