पीटीआय, नवी दिल्ली
अदर पूनावाला यांनी मॅग्मा इन्शुरन्समधील त्यांचा हिस्सा पतंजली आयुर्वेद आणि रजनीगंधाचे निर्माता धर्मपाल सत्यपाल समूह (डीएस ग्रुप) यांना एकूण ४,५०० कोटी रुपयांच्या मोबदल्यात विकण्याची घोषणा केली आहे. या व्यवहारामुळे मॅग्मा इन्शुरन्सच्या मालकीच्या रचनेत लक्षणीय बदल झाला असून, या व्यवहारापश्चात पतंजली आणि डीएस ग्रुपकडे या कंपनीचा ९८% हिस्सा धारण करणार आहेत.
मॅग्मा जनरल इन्शुरन्सची मालकी अदर पूनावाला आणि रायझिंग सन होल्डिंग्ज यांच्याकडे आहे. पतंजली आयुर्वेद आणि डीएस समूहासोबतच्या समभाग खरेदी करारानुसार, सनोती प्रॉपर्टीजने सेलिका डेव्हलपर्स आणि जग्वार ॲडव्हायझरी सर्व्हिसेससह त्यांची विमा उपकंपनी मॅग्मा जनरल इन्शुरन्स (पूर्वीची मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्स कंपनी) ची विक्री करण्यास मान्यता दिली आहे, असे गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हा करार नियामक मंजुरीच्या अधीन असून सुमारे ४,५०० कोटी रुपयांच्या मूल्यांकनावर पार पडला आहे, असे त्यात म्हटले आहे. मॅग्मा जनरल इन्शुरन्स ही विविध श्रेणींमध्ये सामान्य विमा क्षेत्रातील ७० हून अधिक उत्पादनांसह सेवा देते.
शेअर बाजाराच्या गुरुवारच्या सत्रात पंतजली फूड्सचा समभाग ०.९३ टक्क्यांच्या घसरणीसह १,७१८.६० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या समभागाच्या बाजार भावानुसार, कंपनीचे ६२,२१२ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे. समभागाने गेल्या तीन महिन्यात ५.५१ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.केंद्र सरकारने विमा क्षेत्रात १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता देऊन या क्षेत्रात उत्साहवर्धक नियामक सुधारणा केली आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारतात सामान्य विम्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आहे आणि २०४७ पर्यंत ‘सर्वांसाठी विमा’ हा विमा नियामक ‘इर्डा’चे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ही तफावत भरून काढण्यात खूप मदतकारक ठरू शकते, असे पतंजली आयुर्वेदच्या प्रवक्त्याने सांगितले.
पतंजली आयुर्वेद उत्पादने सुमारे २,००,००० विक्रेता बिंदूंसह, रिलायन्स रिटेल, हायपर सिटी, स्टार बाजार आणि राष्ट्रीय स्तरावरील २५० पतंजली मेगा स्टोअर्सच्या साखळीद्वारे उपलब्ध असून, या जाळ्याचा मॅग्मा जनरल इन्शुरन्सला देखील मोठा फायदा होणे अपेक्षित आहे.