मुंबई : अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडला विदेशी गुंतवणुकीची मर्यादा तिच्या एकूण भरणा झालेल्या भागभांडवलाच्या ४९ टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मंजुरी मिळाल्याचे कंपनीने नुकतेच स्पष्ट केले.
कंपनीच्या वाढीच्या शक्यतांना परकीय भांडवलाच्या मदतीने चालना देण्याचा धोरणात्मक प्रयत्न म्हणून कंपनीने हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. या मंजुरीमुळे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार आणि इतर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा कंपनीच्या भागभांडवलात अधिक सहभाग शक्य होईल. जिओ फायनान्शिअलने विदेशी गुंतवणुकीला ४९ टक्क्यांपर्यंत परवानगी देण्यासाठी भागधारकांची संमती यापूर्वीच म्हणजे मे २०२४ मध्ये मिळविली आहे. संपत्ती व्यवस्थापन (म्युच्युअल फंड) आणि दलाली पेढी म्हणून व्यवसाय सुरू करण्यासाठी तिने ब्लॅकरॉक इन्क. या अमेरिकी कंपनीसोबत भागीदारीची एप्रिलमध्ये घोषणा केली आहे.
हेही वाचा : टाटा सन्सकडून सक्तीची सूचिबद्धता टाळण्यासाठी २०,००० कोटींची कर्जफेड
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे समभाग मागील वर्षाच्या ऑगस्टमध्ये भांडवली बाजारात सूचिबद्ध झाले असून, कंपनीचे बाजार भांडवल १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मंगळवारी, कंपनीचा समभाग प्रत्येकी ४० पैशांच्या वाढीसह ३२३.६० रुपयांवर स्थिरावला. समभागाचा वार्षिक उच्चांक ३९४.७० रुपये, तर नीचांक २०४.६५ रुपये असा आहे.