होळीपूर्वी केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आणली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) १३ वा हप्ता आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कर्नाटकातील बेळगावीमधून वितरित केला आहे. यानंतर आता योजनेतील सुमारे आठ कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट 13 व्या हप्त्याचे पैसे जमा केले जातील. या योजनेंतर्गत लाभार्थ शेतकऱ्यांसाठी एकूण 16,800 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. योजनेच्या 13 व्या हप्त्याअंतर्गत आठ कोटींहून अधिक शेतकर्यांना रब्बी कापणीपूर्वी त्यांच्या बँक खात्यात थेट 2,000 रुपये दिले जातील. यापूर्वी 17 ऑक्टोबर 2022 रोजी 12 वा हप्ता जारी करण्यात आला होता आणि आज 13 वा हप्ता जारी झाला आहे. डीबीजीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan Yojana) ही एक सरकारी योजना आहे. ही योजना 1 डिसेंबर 2018 पासून लागू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ती सुरु केली. या योजनच्या माध्यमातून सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना किमान उत्पन्न समर्थन म्हणून प्रति वर्ष 6,000 रुपये दिले जातात. शेतकऱ्यांकडील जमिनीचा आकार विचारात न घेता या योजनेत 125 दशलक्ष शेतकर्यांना सामावून घेण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, देशभरातील सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष 6000 रुपयांची मदत दिली जाते. योजनेनुसार पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांची गणना शेतकरी कुटुंबात केली जाते. यात 2,000 रुपये थेट शेतकरी/शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात जमा केले जाता.. पंतप्रधान किसान योजनेसाठी कोण पात्र आहे? शहरी आणि ग्रामीण भागातील शेतकरी लहान आणि अल्पभूधारक शेतकरी कुटुंबे या योजनेंतर्गत शेतीयोग्य जमीन असलेले जमीनधारक शेतकरी कुटुंब त्यांच्या नावावर अर्ज करू शकतात. पीएम किसान सन्मान निधीसाठी नोंदणी कशी करावी? शेतकऱ्यांना स्थानिक महसूल अधिकारी किंवा नोडल ऑफिसर (राज्य सरकारने नियुक्त केलेले) संपर्क साधावा लागतो. सामान्य सेवा केंद्रांना (CSCs) देखील नाममात्र शुल्क भरून या योजनेसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर 'किसान कॉर्नर' नावाचा विभाग आहे. शेतकरी पोर्टलवर किसान कॉर्नरद्वारे स्वतःची नोंदणी करू शकतात. तसेच पीएम-किसान डेटाबेसमध्ये बदल देखील करू शकतात आणि त्यांच्या पेमेंटची स्थिती जाणून घेऊ शकतात. पीएम-किसान योजनेअंतर्गत नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी आधार अनिवार्य आहे. यासोबत नागरिकत्व प्रमाणपत्र, जमिनीची कागदपत्रे आणि बँक खात्याचे तपशील द्यावे लागतात.