मुंबई: सोने, प्लॅटिनम व हिरेजडित दागिन्यांच्या विक्री दालनांची राज्यातील सर्वात मोठी साखळी असलेल्या पीएनजी ज्वेलर्स लिमिटेडच्या प्रारंभिक समभाग विक्रीने (आयपीओ) गुरुवारी शेवटच्या दिवसांपर्यंत गुंतवणूकदारांकडून ५९.४१ पटीने अधिक भरणा करणारा प्रतिसाद मिळविला. भांडवली बाजारांकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, १,१०० कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केलेल्या या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव हिश्शात १३६.८५ पटीने अधिक समभागांसाठी मागणी आली, तर गैर-संस्थागत गुंतवणूकदारांच्या श्रेणीतून ५६.०८ पट अर्ज आले.

हेही वाचा >>> व्यापाराशी निगडित माहितीसाठी ‘ट्रेड कनेक्ट’, केंद्राकडून आयात-निर्यातदारांसाठी ऑनलाइन मंच

किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या श्रेणीतून १६.५८ पट अधिक भरणा झाला. प्रति समभाग ४५६ रुपये ते ४८० रुपये किंमत पट्ट्यासह मंगळवारपासून खुल्या झालेल्या या आयपीओत पहिल्या काही तासांतच भरणा १०० टक्के पूर्ण करणारी बोली मिळविल्या होत्या. त्या आधी सोमवारी कंपनीने बड्या (अँकर) गुंतवणूकदारांकडून ३३० कोटी रुपये उभे केले आहेत.