मुंबई : युरोपीय बाजारातील सकारात्मक कल आणि बँकांच्या समभागात झालेल्या चौफेर खरेदीने बुधवारच्या सत्रात सेन्सेक्सने २१३ अंशांची कमाई केली. तर निफ्टीने देखील १९,४०० अंशांची पातळी ओलांडली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २१३.१७ अंशांची वधारून ६५,४३३.३० पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने २८४.६८ अंशांची कमाई करत ६५,५०४.७१ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४७.५५ अंशांची भर पडली आणि तो १९,४४४ पातळीवर स्थिरावला.
देशांतर्गत आघाडीवर, बाजारात दिवसभर सकारात्मक वातावरण कायम होते. बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये आलेल्या मजबूत मागणीमुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने दोन शतकी वाढ नोंदवली. मात्र माहिती तंत्रज्ञान आणि औषधी निर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात घसरण झाल्याने वाढ मर्यादित राहिली, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले. सेन्सेक्समध्ये आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, लार्सन अँड टुब्रो, मारुती, टाटा स्टील, कोटक महिंद्र बँक, बजाज फायनान्स, नेस्ले, पॉवरग्रिड आणि एचडीएफसी बँकेचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, टेक महिंद्र, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट आणि महिंद्रच्या समभागात घसरण झाली.
रुपयाची मुसंडी
भांडवली बाजाराच्या निर्देशांकाप्रमाणे भारतीय चलन- रुपयानेही बुधवारच्या सत्रात २८ पैशांची मुसंडी मारत दोन महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली आहे. याआधी, १६ जून रोजी एका दिवसात रुपया ३५ पैशांनी वधारला होता. गेल्या सप्ताहात प्रति डॉलर ८३.१० अशी नीचांकी पातळी गाठणारा रुपया दुसऱ्या सत्रात सावरला आहे. आंतरबँक चलन व्यवहारात रुपयाच्या विनिमय मूल्याने ८३.०२ या कमकुवत पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभरात रुपयाने ८२.६८ रुपयांची उच्चांकी तर ८३.०२ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला.
सेन्सेक्स ६५,४३३.३० २१३.१७ ( ०.३३)
निफ्टी १९,४४४ ४७.५५ ( ०.२५)
डॉलर ८२.७१ -२८
तेल ८३.३३ – ०.८३
