पीटीआय, नवी दिल्ली दर स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकार दररोज आणखी १६ खाद्यान्नांच्या घाऊक, किरकोळ किमतींवर नजर ठेवेल, अशी घोषणा केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी केली. सरकारकडून दैनंदिन गरजेच्या २२ खाद्यान्नांच्या किमतीवर लक्ष ठेवले जाते. त्यामध्ये १ ऑगस्टपासून आणखी १६ पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही संख्या आता ३८ वर गेली आहे. या खाद्यान्नांच्या दैनंदिन घाऊक आणि किरकोळ किमतीची माहिती गोळा करून आणि त्यावर देखरेख ठेवण्याचे कार्य सरकारकडून केले जाते. जेणेकरून खाद्यान्नांचे दर स्थिर ठेवण्यासाठी धोरणात्मक हस्तक्षेप करण्यास मदत होईल. हेही वाचा >>>म्युच्युअल फंड मालमत्तेत ‘प्रुडंट’कडून एक लाख कोटींचा टप्पा ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दरात या २२ खाद्यान्नांचे भारांकन २६.५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आता ती संख्या ३८ झाल्याने भारांकनही ३१ टक्क्यांवर पोहोचेल. महागाई नियंत्रणासाठी केंद्राने किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत १०,००० कोटी रुपयांचे वाटप केले आहे. नव्याने कोणत्या खाद्यपदार्थांचा समावेश? बाजरी, ज्वारी, नाचणी, रवा, मैदा, बेसन, तूप, लोणी (पाश्चराइज्ड), वांगी, अंडी, काळी मिरी, धणे, जिरे, लाल मिरची, हळद आणि केळी या १६ खाद्यान्नांचा नव्याने समावेश केला आहे. आधीपासून देखरेख केल्या जाणाऱ्या २२ खाद्यान्नांमध्ये डाळी, अन्नधान्य, तेल, साखर आणि भाज्यांसारख्या जीवनाश्यक वस्तूंचा समावेश आहे. विद्यमान खाद्यपदार्थ कोणते? तांदूळ, गहू, आटा, हरभरा डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, साखर, गूळ, शेंगदाळ, मोहरी तेल, वनस्पती, सूर्यफूल तेल, सोया तेल, पाम तेल, चहा, दूध, बटाटा, कांदा, टोमॅटो आणि मीठ.