नवी दिल्ली : अमेरिकेच्या व्यापार शुल्क धोरणाबाबत अनिश्चितता, ढेपाळलेली ग्राहक मागणी आणि वाढत्या खर्चाला तोंड देण्यासाठी स्वीकारलेल्या पुनर्रचना योजनेअंतर्गत, प्रॉक्टर अँड गॅम्बलने (पी अँड जी) पुढील दोन वर्षांत ७,००० नोकऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच एकूण कर्मचाऱ्यांपैकी ६ टक्के कर्मचारी कमी केले जाणार असल्याचे कंपनीने गुरुवारी सांगितले. जागतिक पातळीवरील अस्थिरतेचा दाह बहुराष्ट्रीय कंपन्यांना बसत असून त्यातून आता नोकर कपातीचे वारे सुरू झाले आहे.
जगातील सर्वात मोठी ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादनांतील कंपनी ‘पी अँड जी’कडून काही बाजारपेठांमधील ठरावीक उत्पादन श्रेणी आणि नाममुद्रेतून बाहेर पडण्याची योजना देखील आखली जात आहे, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पॅरिसमध्ये सांगितले. एकीकडे वाढत्या महागाईमुळे कंपन्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. ‘पी अँड जी’ आणि यूनिलिव्हरसह जागतिक ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादकांपुढे किमती आणखी वाढविल्या तर मागणीला आणखी फटका बसण्याची शक्यतेचाही पेच आहे. यामुळे पुनर्रचना हा नवीन दृष्टिकोन नव्हे, तर प्रचलित धोरणांचा जाणीवपूर्वक प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न आहे, असे ‘पी अँड जी’चे मुख्य वित्त अधिकारी आंद्रे शुल्टन यांनी सांगितले.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी भागीदारांवर लावलेल्या अतिरिक्त शुल्कामुळे जागतिक बाजारपेठेत गोंधळ उडाला आहे आणि ‘पी अँड जी’ला तिची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या अमेरिकेत मंदीची भीती आहे. कंपनी चीनमधून कच्चा माल, पॅकेजिंग साहित्य आणि काही तयार उत्पादनांची अमेरिकेत आयात करते. ट्रम्प यांच्या व्यापार युद्धामुळे कंपन्यांना विक्रीत ३४ अब्ज डॉलरपेक्षा अधिक नुकसान झाले असून खर्च वाढला आहे, असे रॉयटर्सच्या विश्लेषणातून समोर आले आहे. येत्या काही महिन्यात खर्च आणखी वाढण्याची भीती शुल्टन यांनी व्यक्त केली आहे. कपडे धुण्याचे उत्पादन टाइडच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय व्यापार शुल्काचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जाणार असल्याचे म्हटले आहे.
सरलेल्या वर्षातील ३० जून २०२४ अखेर कंपनीकडे सुमारे १०८,००० कर्मचारी कार्यरत होते. ‘पी अँड जी’ने पुनर्रचनेंतर्गत भूमिका व्यापक करून आणि कार्यरत कर्मचारी संख्येमध्ये संघटनात्मक रचना केली जाणार आहे. काही उत्पादने आणि योजनांवरील खर्च कमी करून पुरवठा साखळीत सुधारणा करण्याचा देखील प्रयत्न असल्याचे ‘पी अँड जी’ने म्हटले आहे.
सिटी बँकेकडून चीनमध्ये नोकरकपात
हाँगकाँग सिटी समूहाने जोखीम आणि विदा व्यवस्थापन सुधारण्यासाठी चीनमधील त्यांच्या दोन तंत्रज्ञान केंद्रांमधील कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ३,५०० ने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. शांघाय आणि डालियान येथील चायना सिटी सोल्युशन सेंटर्समधील कर्मचाऱ्यांची कपात या वर्षी चौथ्या तिमाहीच्या सुरुवातीला पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे बँकेने म्हटले आहे. गेल्या महिन्यात सिटी बँकेने चीनमधील काही कर्मचाऱ्यांची कपात केली होती. याआधी जागतिक पुनर्रचना योजनेअंतर्गत, बँकेने अमेरिका तसेच इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि पोलंडमध्ये कर्मचारी कपात केली आहे. ताज्या नोकर कपातीनंतर सिटीचे चीनमध्ये सुमारे २,००० कर्मचारी असतील, ज्यामध्ये काहीशे हे तंत्रज्ञान विभागातील कर्मचारी असतील.