मुंबई: तांबे, ॲल्युमिनियम आणि पितळ या तीन प्रमुख अलोह धातूंचा पुनर्वापर क्षेत्रातील प्रमुख कंपनी राजपुताना इंडस्ट्रीज लिमिटेडने येत्या मंगळवारी, ३० जुलैपासून प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून भांडवली बाजारात प्रवेश प्रस्तावित केला आहे. ‘एनएसई इमर्ज’ बाजार मंचावर समभागांच्या सूचिबद्धतेसाठी असलेला हा आयपीओ १ ऑगस्ट २०२४ पर्यंत खुला असेल आणि त्यातून कंपनीला २३.८८ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे. देशात दरसाल ८ ते १० टक्के दराने वाढ साधत, २०२५ साली २० अब्ज अमेरिकी डॉलरच्या उलाढालीपर्यंत विस्तारण्याचे लक्ष्य असलेल्या धातू भंगाराच्या पुनर्वापर क्षेत्रातील काही मोजक्या संघटित उद्योगांमध्ये राजपुताना इंडस्ट्रीजचा समावेश होतो. तांबे, पितळ, ॲल्युमिनियमचे भंगार धातूचे संकलन, शुद्धीकरण करून त्यातून सीकर, राजस्थान येथील आधुनिक उत्पादन प्रकल्पातून उच्च दर्जाची उत्पादने ही कंपनी बनवते. यामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी बंदुकीच्या गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या, उंची वस्त्रांसाठी जरी ते ऊर्जा क्षेत्रातील ट्रान्सफॉर्मरसाठी कंडक्टर्ससारखी अनेक उत्पादने तयार केली जातात. दोन वर्षांपूर्वीपर्यंत बाजारात सूचिबद्ध पालक कंपनी शेरा एनर्जी लिमिटेडसाठी जवळपास ९० टक्के उत्पादन घेणाऱ्या कंपनीची, सध्या निम्मी विक्री बाह्य ग्राहकांनाही होत असून, आगामी काही वर्षांत हे प्रमाण ८० टक्क्यांवर नेले जाईल, असे राजपुताना इंडस्ट्रीजचे संचालक शेख नसीम यांनी सांगितले. हेही वाचा >>>Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोने झाले स्वस्त; १० ग्रॅमचा दर पाहून बाजारात उसळली गर्दी कंपनीच्या या आयपीओमध्ये प्रत्येकी ३६ ते ३८ रुपये अशा किमतीवर समभागांसाठी बोली लावता येईल आणि प्रत्येकी किमान ३,००० समभागांसाठी आणि त्यानंतर त्याच पटीत अर्ज गुंतवणूकदारांना सादर करावा लागेल. होलानी कन्सल्टंट्स प्रा. लि.कडून या आयपीओ प्रक्रियेचे व्यवस्थापन पाहिले जात आहे. यातून उभ्या राहणाऱ्या निधीपैकी १४ कोटी रुपये खेळत्या भांडवलाची गरज म्हणून, तर ४.५ कोटी रुपये प्रस्तावित ३ मेगावॅट क्षमतेच्या सौर वीजनिर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी कंपनीकडून वापरात येतील. यातून कंपनीला विजेवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत करता येईल. शिवाय पालक कंपनी शेरा एनर्जीकडून आफ्रिकेतील झांबिया येथे उपकंपनीसाठी गुंतवणूक केली असून, तेथून आयात शुल्कमुक्त तांबे व अन्य धातू राजपुतानालाही सुलभपणे मिळविता येईल, असे शेख यांनी स्पष्ट केले.