Raymond CMD Gautam Singhania: जागतिक अर्थसत्तांच्या स्पर्धेमध्ये चीन वेगाने वाटचाल करत असल्याचं नेहमीच म्हटलं जातं. आर्थिक निकषांच्या बाबतीत चीननं बराच मोठा पल्ला पारदेखील केला आहे. मात्र, दर्जाच्या बाबतीत चीननं अद्याप तशी प्रगती केली नसल्याचा दावा केला जात आहे. हा दावा केला आहे रेमंड उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया यांनी. रेमंडचा बांगलादेशमध्ये मोठा उत्पादन व्यवसाय आहे. मात्र, सध्या तिथे निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या परिस्थितीत रेमंड भारतात सर्व यंत्रणा हलवण्याच्या विचारात असल्याचे सूतोवाच गौतम सिंघानिया यांनी केले आहेत.
बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानंतर जागतिक बाजारपेठेतून रेमंडकडे चिंता व्यक्त करणाऱ्या विचारणा होऊ लागल्या असून ही संधी साधण्यासाठी रेमंड तयार असल्याचं गौतम सिंघानिया यांनी पीटीआयला सांगितल्याचं बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तात म्हटलं आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सूट मेकर्स म्हणून रेमंड उद्योग समूहाकडे पाहिलं जातं. आता रेमंड त्यांचा बांगलादेशमधील सर्व व्यवसाय व यंत्रणा भारतात हलवण्याच्या विचारात आहे.
भारतातील वितरण व्यवस्था महत्त्वाची
“व्यवसाय भारतात हलवला जाण्याची शक्यता आहे. आम्हाला तशी आशा आहे. आमच्याकडे यासंदर्भात अनेकांकडून विचारणा केली जात आहे. एवढ्या मोठ्या निर्णयासाठी थोडा वेळ लागू शकतो, पण आम्ही नक्कीच यामध्ये सकारात्मक दृष्टीने लक्ष घालत आहोत”, असं सिंघानिया म्हणाले. “भारतात मालासाठी वितरण व्यवस्था उत्तम आहे. रेमंडसारख्या कंपन्या गारमेंटिंग व फॅब्रिक अशा दोन्ही प्रकारच्या व्यवसायामध्ये आहेत. त्यामुळे भारतातील या वितरण व्यवस्थेमुळे आमचा बराच वेळ वाचू शकेल”, असंही त्यांनी नमूद केलं.
“बांगलादेशमध्ये फॅब्रिकचा पुरवठा होत नाही. त्यामुळे भारताकडे ही मोठी संधी आहे. कारण आपल्याकडे फॅब्रिकी उपलब्धता आहे. बांगलादेशमध्ये फक्त गारमेंटिंगची बाजारपेठ आहे. भारतात आम्हाला कदाचित मनुष्यबळासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. पण जर सारासार विचार केला, तर इथल्या वितरण व्यवस्थेमुळे उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा वेळ मोठ्या प्रमाणावर घटणार आहे. त्यासाठी ग्राहक किंमतही मोजतील”, असं ते म्हणाले.
भारताच्या ‘फिनटेक’ वैविध्याचा जगाला मोह – पंतप्रधान नरेंद्र मोदी
जागतिक बाजारपेठेत China+1 धोरण!
दरम्यान, जागतिक बाजारपेठेत फक्त चीनवरच अवलंबून न राहाता चीनबरोबरच आणखी एका देशामध्ये उद्योगाचा विस्तार व्हावा, असं धोरण उत्पादक कंपन्या ठेवत आहेत. त्यासाठी भारत हा उत्तम पर्याय आहे, असं सिंघानिया यांनी नमूद केलं. यावेळी चीनपेक्षा भारतात दर्जात्मक काम अधिक होतं, असं ते म्हणाले. “चीनमध्ये संख्यात्मक उत्पादन होतं. तिथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जातं. तुम्हाला जर स्वस्तातला कमी दर्जाचा माल हवा असेल, तर तुम्ही चीनमध्ये जा. भारतात दर्जा महत्त्वाचा आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.
© IE Online Media Services (P) Ltd