मुंबई : आर्थिक वर्ष २०२४-२५ देशाची अर्थव्यवस्था ७ टक्के दराने वाढेल आणि ती जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक वेगवान अर्थव्यवस्था असेल, असे आशादायी अनुमान रिझर्व्ह बँकेने ताज्या वार्षिक अहवालात नोंदवले आहे.

देशांतर्गत पातळीवर महागाई दर आगामी काळात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र जागतिक वित्तीय स्थैर्याला वाढत्या महागाईमुळे धोका कायम आहे. ज्या परिणामी खाद्यपदार्थ आणि अन्नधान्य क्षेत्रातील किमती वाढणार असल्याने पुरवठ्याच्या-बाजूने जोखीम वाढण्याची शक्यता आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वेगाने विस्तार झाला आणि सलग तिसऱ्या वर्षी विकासदर ७ टक्के किंवा त्याहून अधिक राहिला आहे. बाह्य प्रतिकूलता असूनही देशांतर्गत प्रबळ मागणीच्या जोरावर सरलेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) देशाच्या अर्थव्यवस्थेने जोम दर्शविला आहे.

हेही वाचा >>> Stock Market Today Update : नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ची ६१७ अंशांनी गाळण

बँका आणि कंपन्यांचा सुधारलेला ताळेबंद, सरकारच्या भांडवली खर्चात आणि विवेकपूर्ण पतविषयक, नियामक आणि वित्तीय धोरणांवर सरकारने लक्ष केंद्रित केल्याने जीडीपी वाढ मजबूत राहिली आहे, असे मध्यवर्ती बँकेच्या अहवालात म्हटले आहे. देशाची अर्थव्यवस्था प्रतिकूल जागतिक आर्थिक वातावरणातून मार्गक्रमण करत आहे. महागाई कमी होत असल्याने येत्या काळात विशेषतः ग्रामीण भागातून मागणी वाढण्याची शक्यता आहे. याचबरोबर मध्यवर्ती बँकेकडील परकीय चलन गंगाजळीचा साठा सध्या ६४८.७ अब्ज डॉलरच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला जागतिक बाह्य धक्क्यांपासून सुरक्षित ठेवता येऊ शकेल.

हेही वाचा >>> बँकांचे १३,९३० कोटी फसवणुकीत फस्त : रिझर्व्ह बँक

अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने काय?

भू-राजकीय तणाव, जागतिक आर्थिक बाजारातील अस्थिरता, आंतरराष्ट्रीय वस्तूंच्या किमतीतील सतत होणारे चढ-उतार आणि हवामानातील अनियमित घडामोडी यामुळे विकासवेग काहीसा मंदावण्याची शक्यता आहे. शिवाय यामुळे महागाईवाढ होण्याची देखील भीती रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे.

दावा न केलेल्या बँक ठेवी ७८,२१३ कोटींवर

देशभरातील बँकांमधील दावा न केलेल्या ठेवींचे प्रमाण गत वर्षभरात २६ टक्क्यांनी वाढून मार्च २०२४ अखेर ७८,२१३ कोटी रुपये झाले आहे. ही सर्व रक्कम ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये हस्तांतरित केली गेली आहे. गेल्या वर्षी मार्च २०२३ अखेर हा निधी ६२,२२५ कोटी रुपये होता, त्यात यंदा २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

२७,००० कोटींची सुवर्ण रोखे-विक्री

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये गुंतवणूकदारांनी २७,०३१ कोटी रुपये किमतीचे सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी केले. मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील ६,५५१ कोटी रुपयांच्या तुलनेत ही गुंतवणूक चार पटीने जास्त आहे. गुंतवणूकदारांनी सरलेल्या वर्षात ४४.३४ टन सोन्याच्या वजनाचे रोखे खरेदी केले, त्या आधीच्या वर्षात हे प्रमाण १२.२६ टन इतके होते. नोव्हेंबर २०१५ मधील सुरुवातीपासून सुवर्ण रोखे योजनेतून आजवर एकूण ७२,२७४ कोटी रुपये (१४९.९६ टन) विविध उभारण्यात आले आहेत.