वृत्तसंस्था, मुंबई
भारतीय अर्थव्यवस्थेचे पायाभूत घटक चांगल्या स्थितीत असल्याने आगामी पतधोरणात व्याजदरात कपात करण्यास वाव आहे, असे सूतोवाच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सोमवारी केले. याबाबतचा निर्णय पतधोरण समितीच घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पतधोरण समितीने ऑक्टोबरमधील पतधोरण बैठकीवेळी व्याजदर कपातीला वाव असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून अर्थव्यवस्थेच्या पायाभूत घटकांची आकडेवारी चांगली दिसून आली आहे. यामुळे व्याजदर कपातीची संधी अजूनही आहे. मात्र, डिसेंबरमधील पतधोरण बैठकीत व्याजदर कपात करावयाची की नाही याचा निर्णय सर्वस्वी पतधोरण समितीचा असेल. रिझर्व्ह बँकेकडून किंमत स्थिरता आणि विकासदर वाढ या दोन गोष्टींना प्राधान्य दिले दाते. आम्ही विकास दराबाबत कधीही आक्रमक आणि बचावात्मक पवित्रा घेत नाही.
मनीकंट्रोलने घेतलेल्या १८ अर्थतज्ज्ञ, फंड व्यवस्थापकांच्या कल पाहणीत व्याजदर कपातीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आगामी पतधोरण डिसेंबरमध्ये असून, त्यात व्याजदरात पाव टक्का कपात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत किरकोळ महागाईचा दर नीचांकी पातळीवर असल्याने व्याजदर कपातीची चर्चा सुरू आहे.
