मुंबई : रिझर्व्ह बँकेने एडेल्वाईस समूहाच्या दोन कंपन्यांवर नियमांचे पालन न केल्याप्रकरणी बुधवारी कारवाई करताना, त्यांच्यावर व्यावसायिक निर्बंध लादले. एडेल्वाईस समूहातील ईसीएल फायनान्स लिमिटेड(ईसीएल) या कंपनीला कर्जाची परतफेड व्यवहार अथवा खाती बंद करण्याव्यतिरिक्त कोणतेही नवीन व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. तर एडेल्वाईस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन (ईएआरसीएल) कंपनीला नव्याने मालमत्ताचे संपादन, कर्ज पुनर्रचनेस मनाई करण्यात आली आहे. दोन्ही कंपन्यांवर तात्काळ प्रभावाने निर्बंध लादण्यात आले आहेत, असे रिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा >>> मंदीवाल्यांचा पगडा; सलग चौथी घसरण; ‘सेन्सेक्स’ला ६६७ अंशांची झळ

दोन्ही कंपन्यांनी ताणग्रस्त कर्ज लपविण्यास प्रोत्साहन दिले असून, कर्जफेडीत कसूर होणे टाळण्यासाठी बेकायदेशीररित्या नवीन कर्ज पुरवठा केल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आले आहे. यासाठी ईएआरसीएलच्या व्यासपीठाचा गैरवापर करून नियमांना बगल दिल्याचे समोर आले. ही कुप्रथा म्हणजे कर्ज खात्यांचे ‘एव्हरग्रिनिंग’ असल्याचा ठपका रिझर्व्ह बँकेने ठेवला आहे. अलिकडे मध्यवर्ती बँकेने अशा कुप्रथांसाठी वापरल्या जाणाऱ्या वैकल्पिक गुंतवणूक निधीबद्दल (एआयएफ) चिंता व्यक्त केली होती आणि वित्त कंपन्यांना त्यासाठी अधिक तरतूद करण्यास सांगितलेले आहे.

हेही वाचा >>> पेटीएम-अदानींमध्ये हिस्सा खरेदीवर चर्चा सुरू नसल्याचा निर्वाळा

मालमत्तेच्या मूल्यापेक्षा अधिक कर्ज मंजुरीची देखील काही प्रकरणे दोन्ही कंपन्यांबाबत आढळून आली आहेत. दोन्ही कंपन्यांनी कामकाजात सुधारणा केल्यास रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचे निर्बंधांचे पुनरावलोकन केले जाईल, असेही मध्यवर्ती बँकेने सांगितले.

नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी दोषारोप

रशेश शाह यांच्या नेतृत्वाखालील एडेल्वाईस समूहातील ईसीएल आणि ईएआरसीएल या दोन्ही कंपन्या या कला-दिग्दर्शक आणि खोपोलीस्थित एनडी स्टुडिओचे नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तपास आरोपी ठरविल्या गेल्या आहेत. या दोन्ही कंपन्यांनी ‘सिक्युरिटी रिसिप्ट’चा देखील गैरवापर केल्याचे रिझर्व्ह बँकेला आढळून आले. ‘सिक्युरिटी रिसिप्ट’ ही मालमत्ता पुनर्रचना कंपन्यांनी बँका अथवा बँकेतर वित्तीय कंपन्यांकडून कर्जफेड रखडलेल्या संकटग्रस्त मालमत्तेच्या खरेदीचा विचार म्हणून जारी केलेली साधने असून, ती स्वीकारण्यास या कंपन्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे.