लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : स्विस विमा कंपनी असलेल्या झुरिच इन्शुरन्सला देशातील कोटक महिंद्र जनरल इन्शुरन्स या पूर्ण मालकीच्या उपकंपनीतील ७० टक्के भागभांडवल विकण्यास रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्र बँकेला बुधवारी हिरवा कंदील दिला. झुरिच इन्शुरन्स सुमारे ५,५६० कोटी रुपयांना हिस्सेदारी खरेदी करणार आहे.

फेब्रुवारी २०२४ मध्ये झुरिच इन्शुरन्सने कोटक महिंद्र बँकेच्या विमा कंपनीतील ७० टक्के भागभांडवल एकाच टप्प्यात ५,५६० कोटी रुपयांना विकण्याबाबत निर्णय झाला होता. याआधी नोव्हेंबर २०२३ मध्ये, झुरिच इन्शुरन्सकडून समभाग खरेदीच्या माध्यमातून प्रथम ५१ टक्के भागभांडवल आणि नंतर अतिरिक्त १९ टक्के भागभांडवल खरेदी करण्याचा मानस होता.

हेही वाचा >>>कॅनरा एचएसबीसी लाईफमधील १० टक्के हिस्सेदारी पीएनबी विकणार

या व्यवहाराला रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळाल्यानंतर कोटक महिंद्र बँकेचा समभाग बुधवारच्या सत्रात ४.७० टक्क्यांनी वधारला. दिवसअखेर तो ८०.१५ रुपयांनी वधारून १,७१८.१० रुपयांवर बंद झाला. परिणामी दिवसअखेर बँकेचे बाजारभांडवल ३,४१,५४९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.