मुंबई :Rbi tightened norms for non-bank lenders रिझर्व्ह बँकेने ‘पी२पी’ कर्जाशी संबंधित पारदर्शकता आणि अनुपालन सुधारण्यासाठी शुक्रवारी कठोर नियमावली सूचित केली. बॅँकेतर वित्तीय कंपन्यां म्हणून नोंद या ऑनलाइन मंचांकडून अडीअडचणीच्या वेळी अगदी कमी कालावधीत छोट्या रकमेचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

सुधारित निर्देशानुसार, पी२पी मंचांनी गुंतवणूक पर्याय म्हणून भलावण करता येणार नाही. निर्धारित मुदतीत निश्चित परतावा (ॲश्युअर्ड इन्कम), तरलता पर्याय इत्यादी वैशिष्ट्यांसह गुंतवणूक उत्पादन म्हणून ते प्रोत्साहित केले जाऊ नये. शिवाय पी२पी कर्ज वितरण करणाऱ्या मंचांनी कोणत्याही प्रकारे विमा उत्पादने विकता येणार नाहीत, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.

हेही वाचा >>> ‘मुद्रा’ लाभार्थ्यांची पतयोग्यता तपासणे आवश्यक – निती आयोग, ‘ई-केवायसी’साठी मार्गदर्शकतत्त्वांचा आग्रह

नवीन मंजूर निर्देशांनुसार कर्ज देणारा आणि कर्जदार यांची जुळणी (मॅपिंग) केल्याशिवाय कोणतेही कर्ज वितरित केले जाऊ नये. याआधी रिझर्व्ह बँकेने २०१७ मध्ये पी२पी कर्ज वितरण करणाऱ्या मंचांसाठी मार्गदर्शक तत्त्वे सादर केली होती. पी२पी कर्ज व्यासपीठ हे मध्यस्थ म्हणून काम करते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये काही विशिष्ट पद्धतींचा अवलंब सुरू असून, २०१७ च्या नियामक तरतुदींच्या उल्लंघनाच्या घटनाही समोर आल्या आहेत. या क्षेत्रातील काही संस्थांकडून झालेले उल्लंघन लक्षात घेऊन, मध्यवर्ती बँकेने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे तत्काळ लागू केली आहेत.

हेही वाचा >>> Gold-Silver Price: स्वस्त झालेले सोने पुन्हा महागले; मुंबई-पुण्यातील १० ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या…

‘पी२पी लेंडिंग’ म्हणजे काय?

ज्याच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी खर्च वजा वरकड (सरप्लस) रक्कम आहे व जास्त परतावा मिळविण्यासाठी थोडी जोखीम घ्यायची तयारी आहे अशांना ‘पी २ पी लेंडिंग’ मंच अतिरिक्त उत्पन्नाची संधी प्रदान करतो. हा असा गुंतवणूकदारांचा समुदाय आणि ज्याला त्वरित व विनासायास कर्ज हवे असते अशी व्यक्ती यांना समोरासमोर आणणारे हे एक ऑनलाइन सामायिक व्यासपीठ आहे. गुंतवणूकदार आपली रक्कम पी २ पी लेंडिंग सुविधा देऊ करणाऱ्या व्यासपीठांच्या विशेष बँक खात्यांत जमा करतो आणि ज्याला कर्ज हवे असते अशी व्यक्ती तिची कर्ज मागणी या व्यासपीठावर ऑनलाइन पद्धतीने नोदवते. या दोन्हीही व्यक्ती एकमेकास ओळखत असतीलच असे नाही. किंबहुना बहुतांश एकमेकास ओळखत नसतात, परंतु हे व्यासपीठ त्यांच्या परस्पर गरजांची पूर्तता करते.