लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : बाजार भांडवलाच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळाने गुरुवारी एकास एक (१:१) बक्षीस समभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता भागधारकांच्या औपचारिक मंजुरीनंतर बक्षीस समभाग देण्यात येईल.

सुमारे सात वर्षांच्या कालावधीनंतर कंपनीने भागधारकांना बक्षीस समभागाचा लाभ दिला आहे. कंपनीच्या आजवरच्या इतिहासात भागधारकांना पाचव्यांदा बक्षीस समभाग दिले जातील. याआधी सप्टेंबर २०१७ मध्ये कंपनीने बक्षीस समभाग दिले होते. त्यापूर्वी २००९ मध्ये एकास-एक बक्षीस समभाग दिला होता. १९९७ आणि १९८३ मध्येदेखील तिने बक्षीस समभाग दिले होते. कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीचे अधिकृत भागभांडवल १५,००० कोटी रुपयांवरून ५०,००० कोटींपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे.

हेही वाचा >>>‘बजाज हाऊसिंग फिन’पाठोपाठ अन्य ‘एनबीएफसी’ही सूचिबद्धतेचा मार्ग अनुसरणार!

रिलायन्स उद्योग समूहाचे लक्ष्य अल्पकालीन नफा आणि संपत्तीच्या संग्रहणाचे नसून देशासाठी संपत्ती निर्माण करण्याचे ध्येय आहे, असे प्रतिपादन रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गेल्या महिन्यात २९ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले. गुरुवारच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग १.४२ टक्क्यांच्या घसरणीसह २,९८५.९५ रुपयांवर स्थिरावला. समभागाने वर्षभरात २३.२० टक्के परतावा दिला आहे. सध्याच्या बाजारभावानुसार, कंपनीचे २०.२० लाख कोटी रुपये बाजार भांडवल आहे.