पीटीआय, नवी दिल्ली : बाजारात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांमध्ये नवनवीन उच्चांक स्थापित करणारी तेजीच्या पार्श्वभूमीवर, समभाग-संलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांनी सरलेल्या जूनमध्ये तीन महिन्यांतील सर्वाधिक ८,६३७ कोटी रुपये आकर्षित केले. मे महिन्यातील ३,२४० कोटी रुपयांच्या तुलनेत इक्विटी फंडातील गुंतवणुकीचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढले आहे. उल्लेखनीय म्हणजे इक्विटी फंडाच्या स्मॉल कॅप श्रेणीने आजवरचा उच्चांकी गुंतवणूक ओघ अनुभवला.
म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संघटना ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (ॲम्फी)’ने सोमवारी जून महिन्यातील गुंतवणुकीची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार, सलग २८ व्या महिन्यांत समभाग-संलग्न अर्थात इक्विटी फंडांमध्ये गुंतवणुकीचा सकारात्मक राहिला आहे. यापूर्वी मार्च २०२३ मध्ये इक्विटी फंडांनी २०,५३४ कोटी रुपयांची नक्त आवक अनुभवली होती, तर एप्रिलमध्ये हे प्रमाण ६,४८० कोटी रुपये होते. महिनागणिक उत्स्फूर्तपणे वाढत असलेल्या ‘एसआयपी’ (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स) प्रवाहाचे इक्विटी फंडातील ओघात मोठे योगदान राहिले आहे. जरी मे महिन्यातील १४,७४९ कोटी रुपयांच्या तुलनेत, जून महिन्यातील ‘एसआयपी’मार्फत गुंतवणुकीचे प्रमाण १४,७३४ कोटी रुपये असे किंचित घटले असले तरी सलग चौथ्या महिन्यांत प्रति माह १४,००० कोटी रुपयांहून अधिक ओघ या माध्यमातून सुरू असल्याचे दिसले आहे.
मागील महिन्यातील ४५,९५९ कोटी रुपयांच्या तुलनेत जूनमध्ये रोखेसंलग्न अर्थात डेट फंडांमध्ये केवळ १४,१३५ कोटी रुपयांचा निव्वळ गुंतवणुकीचा प्रवाह दिसून आला. इक्विटीव्यतिरिक्त, हायब्रिड योजनांमध्ये ४,६११ कोटी रुपयांचा प्रवाह दिसून आला, ज्यापैकी ३,३६६ कोटी रुपये असा मोठा भाग आर्बिट्राज फंडांमधील गुंतवणुकीचा होता. तथापि, एकूण ४३ म्युच्युअल फंड घराणी कार्यरत असलेल्या या उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील सरासरी मालमत्ता अर्थात एकूण गंगाजळी ही मे महिन्याच्या अखेरीस असलेल्या ४२.९ लाख कोटी रुपयांवरून, जूनअखेरीस ४४.८ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. विशेषकरून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निरंतर सुरू असलेल्या खरेदीमुळे भांडवली बाजारात दिसून येत असलेल्या चैतन्यातून हे घडले आहे.
‘स्मॉलकॅप’कडे वाढता कल
सध्याच्या उत्साही बाजार वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, तुलनेने मागे राहिलेल्या व त्या परिणामी मूल्यांकनातील लक्षणीय फरकामुळे गुंतवणूकदारांनी ‘स्मॉलकॅप’कडे वळण घेतले आहे. समभाग-संलग्न प्रकारात, स्मॉलकॅप फंडांना मागणी कायम राहिली असून, जूनमध्ये या फंडातील निव्वळ गुंतवणूक महिनागणिक ६६ टक्क्यांनी वाढून ५,४७१.७५ कोटी रुपये अशा सार्वकालिक मासिक उच्चांक गाठणारी राहिली. त्यापाठोपाठ व्हॅल्यू फंड (२,२३९ कोटी) आणि मिड-कॅप फंड (१,७४९ कोटी) असे प्रमाण राहिले.
वार्षिक आधारावर व्यवस्थापनाखालील सरासरी मालमत्तेमध्ये २५ टक्क्यांची प्रभावी वाढ ही छोट्या किरकोळ गुंतवणूकदारांमधील सकारात्मक कल अधोरेखित करणारी आहे. विशेष उत्साहवर्धक बाब म्हणजे त्यांचा हा पैसा समभाग-संलग्न योजनांमध्ये येत आहे आणि स्मॉल-कॅप फंडातील आवक सार्वकालिक उच्च पातळीवर आहे. – एन. एस. व्यंकटेश, मुख्य कार्यकारी अधिकारी, ॲम्फी
