मुंबई : बाजार भांडवलाच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा डिसेंबरअखेर तिमाहीतील महसूल मागील वर्षाच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढून २.९४ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. डिजिटल सेवा, किराणा व्यवसायातील वाढ आणि तेल आणि वायू व्यवसायातील वृद्धीच्या जोरावर कंपनीने ही वाढ साधली आहे. आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील निव्वळ नफा मागील वर्षाच्या तुलनेत १.६ टक्क्यांनी वाढून २२,२९० कोटी रुपये झाला, तर करपूर्व नफ्यात ३.७ टक्क्यांनी वाढ होऊन तो २९,६९७ कोटी रुपये झाला.
तिमाहीतील रिलायन्सची एकत्रित कामगिरी सर्व व्यवसायांमध्ये सातत्यपूर्ण आर्थिक वितरण आणि कार्यात्मक लवचिकतेचे प्रतिबिंब दर्शवते, असे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी दिलेल्या निवेदनात मत व्यक्त केले.
जिओ-बीपी या किरकोळ इंधन विक्री व्यवसायाने वाढ कायम ठेवली, ज्यात पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेलच्या विक्रीतील जोरदार वाढीमुळे एकूण विक्रीत २४ टक्क्यांनी वाढ झाली. किरकोळ विक्रीचा विस्तार झाला असून, डिसेंबरअखेर जिओ-बीपीची २,१२५ केंद्रे कार्यरत होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत १४ टक्क्यांनी अधिक आहे. अनुकूल मागणी-पुरवठा स्थिती आणि कार्यात्मक लवचिकतेसह इंधनाच्या मार्जिनमध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे तेल आणि वायू व्यवसायात मजबूत वाढ झाली. इंधन किरकोळ विक्री व्यवसायातील मजबूत वाढ आणि जिओ-बीपीचा विस्तार होत असल्याबद्दल आनंद होत असल्याचे अंबानी यांनी पुढे सांगितले.
डिजिटल सेवा व्यवसायानेही दमदार वाढ नोंदवली, ज्यात महसूल १२.७ टक्क्यांनी वाढून ४३,६८३ कोटी रुपये झाला. ग्राहकांच्या वाढत्या संख्येची आणि मार्जिनमध्ये १७० आधारबिंदूंची वाढ झाल्याने मदत मिळाली. रिलायन्स जिओचा ग्राहकवर्ग ५१.५३ कोटींवर पोहोचला आहे, तर या तिमाहीत ५जी वापरकर्त्यांची संख्या २५ कोटींच्या पुढे गेली. तर जिओ एअर फायबर ही जागतिक स्तरावर १ कोटी ग्राहकांचा टप्पा पार करणारी पहिली फिक्स्ड वायरलेस सेवा ठरली. प्रति वापरकर्ता सरासरी महसूल मागील वर्षाच्या तुलनेत ५.१ टक्क्यांनी वाढून २१३.७ रुपये झाला आहे.
या तिमाहीत कंपनीचा भांडवली खर्च ३३,८२६ कोटी रुपये होता, जो ४१,३०३ कोटी रुपयांच्या रोख नफ्यातून पूर्णपणे भागवला गेला. ३१ डिसेंबरपर्यंत निव्वळ कर्ज कमी होऊन १.१७ लाख कोटी रुपयांवर आले, जे ताळेबंदातील स्थिरता दर्शवते.
