पीटीआय, नवी दिल्ली : फ्रेंच वाहन निर्माता कंपनी रेनॉ इंडियाने वाढत्या उत्पादन खर्चाचा परिणाम भरून काढण्यासाठी कंपनी जानेवारीपासून वाहनांच्या किमती २ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनी भारतीय बाजारपेठेत क्विड, ट्रायबर आणि कायगर या तीन वाहनांची विक्री करते.
किंमत वाढ ही वाहन प्रकार आणि श्रेणीनुसार वेगवेगळी असेल आणि वाढता उत्पादन खर्च व सध्याच्या जागतिक अनिश्चित परिस्थितीमुळे ही वाढ करणे आवश्यक झाले आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. या दरवाढीनंतरही, कंपनी उच्च-गुणवत्तेची उत्पादने आणि सेवा प्रदान करण्याच्या वचनबद्धतेवर ठाम आहे, असेही त्यात नमूद केले आहे.
युरोच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू आणि ऑडी यांसारख्या विविध वाहन निर्मात्या कंपन्यांनी आधीच पुढील महिन्यापासून वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.
