पीटीआय, नवी दिल्ली

देशातील किरकोळ महागाई दराने सरलेल्या डिसेंबर महिन्यात १.३३ टक्के असा तीन महिन्यांच्या उच्चांकी दर नोंदविल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या सरकारच्या मासिक आकडेवारीतून समोर आले. महागाईचा हा दर रिझर्व्ह बँकेने तिमाहीसाठी व्यक्त केलेल्या अनुमानापेक्षाही जास्त आहे.

गत काही महिन्यांत किरकोळ महागाई दराचा आलेख चढता राहिला आहे. व्यक्तिगत निगेच्या वस्तूंच्या किमतीत सर्वाधिक २८.०७ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. याचबरोबर मांस व माशांच्या किमतीत ५.१२ टक्के, अंड्यांच्या किमतीत ४.७६ टक्के वाढ झाली आहे, असे किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दराची आकडेवारी जाहीर करताना, केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी विभागाने स्पष्ट केले. आधीच्या नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ०.७१ टक्के होता, तो डिसेंबरमध्ये वाढून १.३३ टक्क्यांवर पोहोचला. भाज्या, मांस व मासे, अंडी, मसाले आणि डाळींच्या किमतीतील वाढीने सरलेल्या महिन्यात एकंदर महागाई दरात चढ दिसून आला.

उल्लेखनीय बाब म्हणजे डिसेंबर महिन्यात ग्रामीण आणि शहरी असे दोन्हीकडे महागाई दरात वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील महागाई दरात वाढ होऊन तो ०.७६ टक्के झाला आहे. याचवेळी शहरी भागातील महागाईचा दर २.०३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, घरगुती महागाईत काही प्रमाणात घट होऊन ती २.८६ टक्क्यांवर आली आहे. याचवेळी आरोग्य आणि शिक्षण महागाईही किंचित कमी होऊन अनुक्रमे ३.३२ टक्के आणि ३.४३ टक्क्यांवर उतरली आहे. इंधन व ऊर्जा महागाईत घट होऊन ती १.९७ टक्के झाली असून, दळणवळण महागाईही कमी होऊन ०.७६ टक्के नोंदविण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेचा २ टक्क्यांचा अंदाज

चालू २०२५-२६ आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर सरासरी २.६ टक्के राहील, असा सुधारीत अंदाज रिझर्व्ह बँकेने अलिकडेच वर्तविला आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने डिसेंबरमधील पतधोरणात महागाईचा दराचा अंदाज कमी करून २ टक्क्यांवर आणला आहे. रिझर्व्ह बँकेचे किरकोळ महागाई दराचे जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीसाठीचे अनुमान ०.८ टक्क्यांचे आहे. जो या दराचा चढता आलेख पाहता प्रत्यक्षात जास्त राहू शकेल. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीकडून व्याजदर ठरविताना प्रामुख्याने किरकोळ महागाई दराचा विचार केला जात असला, तरी सध्याची त्यातील वाढ ही चिंता करावी इतकी नसल्याचे ती मध्यवर्ती बँकेच्या ४ टक्के या उद्दिष्टापेक्षा खूप कमी आहे, अशी कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचे मुख्य अर्थतज्ज्ञ सुवोदीप रक्षित यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.