मुंबई: अमेरिकेतील मंदीच्या चिंतेने भांडवली बाजारातील सेन्सेक्स-निफ्टीची तीव्र घसरगुंडी आणि माघारी फिरलेल्या विदेशी गुंतवणूकदारांकडून वाढलेल्या डॉलरच्या मागणीने सोमवारी स्थानिक चलन रुपयाची वाताहत केली. डॉलरच्या तुलनेत तो ३१ पैसे घसरून ८४.०३ या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला. आंतरबँक चलन बाजारात सोमवारी रुपया ८३.७८ असा घसरणीसह खुला झाला. सत्रादरम्यान त्याने डॉलरच्या तुलनेत ८३.७६ च्या उच्चांकापासून, ८४.०३ च्या नीचांकी पातळीपर्यंत घसरण अनुभवली. सत्रअखेरीस अमेरिकी चलनाच्या तुलनेत ८४.०३ या ताज्या विक्रमी नीचांकांवरच तो स्थिरावला. शुक्रवारच्या बंद पातळीच्या तुलनेत त्याने ३१ पैशांचे मूल्य गमावल्याचे यातून अधोरेखित झाले. शुक्रवारी, डॉलरच्या तुलनेत रुपया एका पैशांच्या कमाईसह ८३.७२ या पातळीवर स्थिरावला होता. हेही वाचा >>> कामशेतमधील आदिवासी पाड्यावरील चिमुरड्यांसाठी ‘ससून’ बनले ‘माय’! वाढलेली जागतिक जोखीम पाहता रुपयाचा कल नकारात्मक असेल असे अपेक्षित होतेच. आग्नेय आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाने खनिज तेलाच्या किमतीही तापत गेल्या तर रुपयाच्या मूल्यासाठी ही आणखी प्रतिकूल बाब ठरेल. तथापि तूर्त तेलाच्या घसरलेल्या किमती सोमवारच्या पडझडीत रुपयाला अपेक्षित आधार देणाऱ्या ठरल्या, असे बीएनपी परिबा-शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांनी स्पष्ट केेले. दरम्यान, सहा जागतिक चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलरची मजबूती मोजणारा डॉलर निर्देशांक ०.६५ टक्क्यांनी घसरून १०२.५४ वर आला असून, कमकुवत अमेरिकन डॉलर आणि अशा रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही हस्तक्षेपाचा रुपयाच्या मूल्याला फायदा होऊ शकतो, असे चौधरी यांनी नमूद केले. विदेशी गुंतवणूकदारांचे पलायन मूल्यघातक विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची भांडवली बाजारात निरंतर विक्री सुरू आहे. सरलेल्या शुक्रवारीही ते निव्वळ विक्रेते होते आणि त्यांनी ३,३१० कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले. सोमवारीही सेन्सेक्स-निफ्टीतील जवळपास ३ टक्क्यांच्या आणि तब्बल १७ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवलाची धूळदाण करणाऱ्या पडझडीत विदेशी गुंतवणूकदारांकडून झालेल्या समभाग विक्रीचा वाटा मोठा राहिला. त्यांनी लक्षणीयरीत्या गुंतवणूक काढून डॉलरच्या रूपात माघारी नेल्याचा रुपयाच्या मूल्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहे.