मुंबई : रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्र बँकेवरील निर्बंध अखेर नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर मागे घेतले आहे. ऑनलाईन आणि मोबाइल बँकिंग माध्यमातून नवीन ग्राहक नोंदवण्यासह नव्याने क्रेडिट कार्ड वितरीत करण्यास आता मुभा देण्यात आली आहे.

बँकेच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) प्रणालीच्या २०२२ आणि २०२३ या वर्षातील परीक्षणात आढळून आलेल्या त्रुटी आणि उणिवांमुळे आणि त्यांचे वेळेवर निराकरण करण्यात बँक अपयशी ठरल्याने एप्रिल २०२४ मध्ये रिझर्व्ह बँकेने त्यांच्या ऑनलाईन आणि मोबाइल बँकिंग माध्यमातून नवीन ग्राहक ग्राहक जोडणे आणि नवीन क्रेडिट कार्ड देण्यापासून रोखले होते. बँकेने यासंबंधी उपाययोजना केल्यांनतर ही मुभा देण्यात आली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये बँकिंग नियमन कायद्याच्या कलम ३५अ अंतर्गत कोटक महिंद्रा बँकेविरुद्ध पर्यवेक्षी कारवाईची घोषणा केली होती. रिझर्व्ह बँकेकडून निदर्शनास आणल्या गेलेल्या सर्व उणीवांबाबत सर्वसमावेशक बाह्य लेखापरीक्षण करून, समाधानाकारक बदल दिसून आल्यानंतर निर्बंधांचे पुनरावलोकन करण्यात आले.

बुधवारी भांडवली बाजार व्यवहार आटोपल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांचा आदेश आला. त्या आधी बुधवारच्या सत्रात कोटक महिंद्र बँकेचा समभाग १.३२ टक्क्यांनी वधारून १,९४३.४२ रुपयांवर स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, बँकेचे ३.६६ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.

Story img Loader