मुंबई : भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने वायदे बाजार करार समाप्तीसाठी (इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज) राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईला मंगळवार, तर मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईला गुरुवार अशा वेगवगेळ्या दिवसांना मान्यता दिल्याचे मंगळवारी जाहीर केले. दोन्ही बाजारमंचांना त्यांच्या मागणीला अनुसरून ही मान्यता दिली गेली.
सध्या एनएसईमध्ये गुरुवारी वायदे करार अर्थात फ्युचर्स अँड ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट समाप्ती होते, तर बीएसईमध्ये मंगळवारी करार समाप्ती होते. आता मात्र सेबीने एनएसईने प्रस्तावित केलेल्या मंगळवारसाठी सहमती दर्शविली आहे, तर बीएसईला गुरुवार या दिवसासाठी सहमती दर्शवून उलटफेर घडवून आणला आहे. येत्या १ सप्टेंबर २०२५ पासून आणि त्यापुढील नवीन वायदे व्यवहारांसाठी नव्याने निर्धारीत दिवसांनुसार वेळापत्रक लागू होईल. तर, या तारखेपूर्वी मुदत संपणारे करार आधीप्रमाणेच संपुष्टात येतील.
सर्व इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज कॉन्ट्रॅक्ट्सची समाप्ती मंगळवार किंवा गुरुवारी होईल, असे सेबीने म्हटले होते. मार्च महिन्यात पार पडलेल्या बैठकीत सेबीने याबाबद्दल चर्चा केली होती.
एफ अँड ओ व्यवहारांमध्ये घट
मार्च २०२५ मध्ये एफ अँड ओ श्रेणीमधील सक्रिय ग्राहकांची संख्या ५३ लाखांवरून कमी होऊन ३१ लाखांपर्यंत घसरली आहे. या घसरणीचे एक प्रमुख कारण एफ अँड ओ नियमांच्या अंमलबजावणीतील अस्पष्टतेला मानले जाते. किरकोळ गुंतवणूकदारांचे एफ अँड ओ व्यवहारांमधील वाढते स्वारस्य कमी करण्यासाठी मधल्या काळात ‘सेबी’ने नियम कठोर केले. ज्यामध्ये आठवड्यामधील करार संख्या कमी करण्यात आली. शिवाय सेन्सेक्स आणि निफ्टीचे ‘लॉट साईज’ वाढवून किमान वायदे आणि गुंतवणुकीची मात्रा देखील वाढवण्यात आली.