मुंबई : सामान्य गुंतवणूकदारांच्या फ्युचर्स आणि ऑप्शन्स (एफ ॲण्ड ओ) व्यवहारामधील गुंतवणूकदारांच्या वाढत्या स्वारस्याची बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी सोमवारी येथे बोलताना दखल घेत, ही बाब ‘धक्कादायक आणि गोंधळात टाकणारी’ असल्याचे नमूद केले. या व्यवहारांतील अपयशाचा धोका अधोरेखित करताना ९० टक्के लोकांनी पैसे गमावले आहेत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
आशियातील सर्वात जुना भांडवली बाजार असलेल्या बीएसई येथे गुंतवणूकदार जोखीम व्यासपीठ – ‘इन्व्हेस्टर रिस्क रिडक्शन ॲक्सेस (आयआरआरए)’चे अनावरण बुच यांच्या हस्ते झाले. त्या वेळी बोलताना बुच यांनी भांडवली बाजार नियामकांच्या अलीकडील शोध व निरीक्षणांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. यानुसार एफ ॲण्ड ओमधील ४५.२४ लाख वैयक्तिक उलाढालकर्त्यांपैकी केवळ ११ टक्केच (सराईत) व्यापारी आहेत आणि त्या विभागालाच नफा कमावता आला आहे. बुच म्हणाल्या की, वैयक्तिक गुंतवणूकदारांनी महागाईला मात देणारा सरस परतावा मिळण्याची शक्यता अधिक जास्त आहे, अशा दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीवर लक्ष देण्याची गरज आहे.
हेही वाचा : ‘ॲम्वे’कडून बहुस्तर साखळी योजनेतून ४,००० कोटींची लुबाडणूक! ‘ईडी’कडून आरोपपत्र दाखल
‘सेबी’च्या निरीक्षणानुसार, करोना महासाथीच्या काळात एफ ॲण्ड ओ विभागातील सहभागामध्ये झपाट्याने वाढ झाली होती. वैयक्तिक अनन्य व्यापाऱ्यांची एकूण संख्या आर्थिक वर्ष २०१९ मधील ७.१ लाखांवरून तब्बल पाच पटीहून (५०० टक्के) अधिक वाढली होती. ‘पैसा कमावला जाण्यापेक्षा गमावला जाण्याची शक्यता जेथे खूपच जास्त आहे, त्या गोष्टीकडे लोकांचा इतका कल का असावा, ही बाब माझ्यासाठी धक्कादायक आणि संभ्रमात टाकणारी आहे, हे मी बिनदिक्कत कबूलच करते,’ असे बुच या प्रसंगी म्हणाल्या. गुंतवणुकीचा दृष्टिकोन लांबच्या पल्ल्याचा राखल्यास, गुंतवणूकदार दीर्घकाळापर्यंत संपत्ती निर्माण करू शकतील आणि महागाई दरापेक्षा वरचढ परतावा मिळवण्याची ‘खूप चांगली संधी’ अशा गुंतवणूकदारांकडे असेल, असे सेबीप्रमुख म्हणाल्या.
हेही वाचा : दिवाळखोर रिलायन्स कॅपिटलवर ‘हिंदुजां’च्या पाच संचालकांच्या नियुक्तीला रिझर्व्ह बँकेची सशर्त मान्यता
दलालाच्या व्यवहार प्रणालीत अडसर आल्यास, व्यापाऱ्याला नुकसान टाळण्यासाठी अथवा नफा पदरी बांधून घेण्यासाठी विनाबाधा त्याचे व्यवहार वेळेत पूर्ण करण्यास मदतकारक ‘आयआरआरए’ व्यासपीठाची संकल्पना आणि प्रस्ताव सेबीने सर्वप्रथम डिसेंबर २०२२ मध्ये पुढे आणला होता. कठीण प्रसंगात गरज आणि क्षमता यांचा ‘परिपूर्ण समतोल’ साधण्याचा हा प्रयत्न असल्याचे बुच म्हणाल्या.
नवीन ‘आयआरआरए’ काय?
व्यापाऱ्याला त्याच्या किंवा तिच्या दलालावर (ब्रोकर) वीजपुरवठा खंडित होणे अथवा इंटरनेटमध्ये बिघाडासारख्या अडसराचा सामना करण्याचा प्रसंग ओढवल्यास, पर्यायी व्यवस्था म्हणून ‘आयआरआरए’ डाऊनलोड करण्यास फायद्याचे ठरेल अशा दुव्यासह लघुसंदेश मोबाइल फोनवर मिळेल आणि तो दोन तासांच्या आत संबंधित व्यापारी त्याची बाजारातील व्यवहार स्थितीचा (ओपन पोझिशन्स) नफ्याच्या अंगाने खरेदी अथवा विक्री आज्ञेद्वारे (स्क्वेअर ऑफ) पूर्ण करण्यास सक्षम ठरेल.
‘सेबी’चे निरीक्षण आणि चिंता
० एफ ॲण्ड ओ विभागातील सहभागात करोनाकाळात झपाट्याने वाढ झाली. वैयक्तिक अनन्य व्यापाऱ्यांची एकूण संख्या आर्थिक वर्ष २०१९ मधील ७.१ लाखांवरून तब्बल पाच पटीहून (५०० टक्के) अधिक वाढली.
० सध्या २०-३० वयोगटातील गुंतवणूकदार एकतृतीयांशपेक्षा जास्त असून, आर्थिक वर्ष २०१९ मध्ये हे प्रमाण केवळ ११ टक्के होते.
० या विभागातील सध्याच्या ४५.२४ लाख वैयक्तिक उलाढालकर्त्यांपैकी जेमतेम ११ टक्केच असे आहेत ज्यांना नफा कमावता आला आहे.
० पैसे गमावलेल्या ८९ टक्के लोकांचा सरासरी तोटा प्रत्येकी १.१ लाख रुपये होता, तर भाग्यवान ठरलेल्या अल्पसंख्याकांसाठी सरासरी नफा प्रत्येकी १.५ लाख रुपये होता.