मुंबई : भांडवली बाजारात व्यवहार करण्यासाठी उघडण्यात येणारे ट्रेडिंग आणि डिमॅट खातेधारकांना नामनिर्देशनाची (नॉमिनी) नोंद करण्यासाठी मुदत भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने डिसेंबर अखेरपर्यंत वाढवण्याचा मंगळवारी निर्णय घेतला. पूर्वनिर्धारित वेळापत्रकाप्रमाणे याची मुदत ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपुष्टात येणार होती. ट्रेडिंग आणि डिमॅट खात्यांसाठी नामनिर्देशनाची नोंदणी करणे गुंतवणूकदारांना आवश्यक आहे. हा पर्याय न स्वीकारल्यास ट्रेडिंग आणि डिमॅट खाते गोठवले जाईल, असा इशाराही ‘सेबी’ने दिला होता.
हेही वाचा : ‘कॉसमॉस’मध्ये एसडीसी बँकेचे विलीनीकरण; मुंबईतील शाखांची संख्या ५० वर
मात्र आता ही मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. भांडवली बाजारातील मध्यस्थ अर्थात दलाल, दलाली पेढ्या आणि डिपॉझिटरी यांनी त्यांच्या ग्राहकांना वारस नोंदणीचा एक पर्याय स्वीकारण्याबाबत आठवण करून देणारे ई-मेल आणि एसएमएस पंधरवड्याच्या कालावधीत पाठवावेत, अशी सूचनाही ‘सेबी’ने केली होती. आधी नामनिर्देशित व्यक्तीची नोंदणी केलेल्या गुंतवणूकदारांनाही नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. परंतु, ज्यांनी नोंदणी केलेली नसेल त्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे.