मुंबई : जागतिक बाजारपेठेतील कमकुवत कल आणि देशांतर्गत आघाडीवर खासगी बँकांच्या समभागांमध्ये विक्रीचा मारा झाल्याने शुक्रवारी सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स ४६६ अंशांच्या नुकसानीसह बंद झाला.महिन्याच्या शेवटच्या सत्रातील व्यवहारात, सेन्सेक्स ४६५.७५ अंशांनी घसरून ८३,९३८.७१ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ४९८.८ अंश गमावत ८३,९०५.६६ या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे निफ्टी १५५.७५ अंशांनी घसरला आणि २५,७२२.१० पातळीवर बंद झाला. परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्री आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या भविष्यातील दर कपातीबाबत अस्पष्टता कायम असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली, असे विश्लेषकांनी म्हटले आहे.
फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांचे कठोर भाष्य करणारे समालोचन आणि अमेरिका-चीन व्यापार करार अपेक्षेनुरूप राहण्याची शक्यता कमी असल्याने पुन्हा एकदा सावध बनलेल्या परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग विक्री करून सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकावर दबाव निर्माण केला. क्षेत्रवार आढावा घेतल्यास, बहुतेक क्षेत्रीय निर्देशांकही नकारात्मक पातळीवर बंद झाले आहे. मात्र, संभाव्य वाढीव परदेशी गुंतवणूक मर्यादा (एफडीआय) आणि चांगल्या तिमाही निकालांच्या अपेक्षेने सरकारी बँकांच्या समभागांमध्ये वाढ झाली. मजबूत तेजीनंतर, भांडवली बाजारात नफावसुली देखील झाली आहे, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
देशांतर्गत आघाडीवर सेन्सेक्समध्ये इटर्नल, एनटीपीसी, कोटक महिंद्र बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड, ट्रेंट आणि एचडीएफसी बँक हे घसरणीस कारणीभूत ठरले. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, लार्सन अँड टुब्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयटीसी आणि स्टेट बँकेचे समभाग तेजीसह स्थिरावले. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ३,०७७.५९ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली. तर, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) २,४६९.३४ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.
साडेचार टक्क्यांची मासिक वाढ
सरलेल्या ऑक्टोबर महिना भारतीय भांडवली बाजारासाठी सर्वोत्तम वाढीचा ठरला. निर्देशांकांनी गेल्या सात महिन्यांतील सर्वात मोठी मासिक वाढ नोंदवली. कंपन्यांची समाधानकारक तिमाही कामगिरी आणि वाजवी मूल्यांकनामुळे परदेशी गुंतवणूकदार पुन्हा आकर्षित झाले आहेत. ते सरलेल्या महिन्यात निव्वळ खरेदीदार बनल्याचेही दिसून आले. परिणामी ऑक्टोबरमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स अनुक्रमे ४.५ टक्के आणि ४.६ टक्क्यांनी वधारले. शिवाय दोन्ही निर्देशांक सप्टेंबर २०२४ मध्ये गाठलेल्या त्यांच्या सार्वकालिक उच्चांकापेक्षा सध्या अनुक्रमे २.१ टक्के आणि २.४ टक्के दूर आहेत.
सेन्सेक्स ८३,९३८.७१ -४६५.७५ (-०.५५%)
निफ्टी २५,७२२.१० -१५५.७५ (-०.६०%)
तेल ६४.८० – ०.३१%
डॉलर ८८.६९
