Sensex Today Stock Market Update: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे चिंतेत सापडलेल्या गुंतवणूकदारांना आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटनं मोठा धक्का दिला. सोमवारी मुंबई शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच पहिल्या अर्ध्या तासात गुंतवणूकदारांना जवळपास १५ लाख कोटींचा फटका बसला. एकीकडे सेन्सेक्सनं तब्बल २४०० अंकांहून जास्त मोठी घसरण नोंदवली असतानाच दुसरीकडे निफ्टी ५० नंही सेन्सेक्सच्याच पावलावर पाऊल ठेवलं आणि गुंतवणूकदारांचे हजारो कोटी घटल्याचं दिसून आलं. त्यामुळे सोमवारची सकाळ गुंतवणूकदारांच्यां चिंतेत मोठी भर घालणारी ठरली.

स्मॉल व मिडकॅप शेअर्सचे दर घसरले

मुंबई शेअर बाजारासाठी सोमवारच्या व्यवहाराची सुरुवात धक्कादायक अशी राहिली. अमेरिकेत मंदी येण्याच्या शक्यता सध्या चर्चेत असून त्याचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर झाल्याचं बोललं जात आहे. आज सकाळी व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्सची सुरुवातच निराशाजनक झाली. सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये तब्बल २४०१.४९ अंकांनी खाली घसरून सेन्सेक्स ७८,५८०.४६ अंकांवर आला. यावेळी स्मॉल व मिडकॅप शेअर्सच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.

सेन्सेक्सनं आज मोठी घसरण नोंदवली आहे (फोटो – प्रातिनिधिक छायाचित्र)

Sensex पाठोपाठ निफ्टीनंही उलट्या दिशेनं प्रवास सुरू केला. सेन्सेक्स २४०० हून जास्त अंकांनी घसरल्यानंतर निफ्टीनं ४८९.६५ अंकांची घसरण नोंदवली. निफ्टी ५० चे व्यवहार सकाळच्या सत्रात २४,२२८.०५ अंकावर चालू होते.

१५ लाख कोटींचा फटका!

दरम्यान, मुंबई शेअर बाजारात Sensex आणि Nifty50 च्या गटांगळ्यांमुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या मोठ्या घसरणीमुळे शेअर बाजाराचं एकूण मूल्य ४५७.१६ लाख कोटींवरून घसरून थेट ४४६.९२ लाख कोटींपर्यंत खाली आलं आहे. त्यामुळे एकूण मूल्य तब्बल १५ लाख २४ हजार कोटींनी घसरल्याचं दिसून आलं आहे.

World Bank Report: “२०४७ नाही तर पुढची ७५ वर्ष लागतील तरीही आपण…”, जागतिक बँकेचा इशारा काय सांगतो?

मुंबई शेअर मार्केटमध्ये निर्माण झालेल्या या परिस्थितीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थिती जबाबदार ठरल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे रिअॅलिटी क्षेत्र, आयटी, बँकिंग व आर्थिक सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे.