मुंबई: भारत-पाकिस्तानमधील युद्धाचे ढग गडद होत चालल्याने मंगळवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबिला. परिणामी बँकिंग आणि तेल कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले.
मंगळवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १५५.७७ अंशांनी घसरून ८०,६४१.०७ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ३१५.८१ अंश गमावत ८०,४८१.०३ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ८१.५५ अंशांची घसरण झाली आणि तो २४,३७९.६० पातळीवर बंद झाला.
अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयापूर्वी आणि अमेरिका-चीन व्यापार वाटाघाटींसंबंधाने चिंतेमुळे बाजार ठरावीक पातळीवर व्यवहार करत होता, असे विश्लेषकांनी सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘मॉक ड्रिल’ करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारत-पाकिस्तान सीमा तणावादरम्यान सावध भावनांमुळे गेल्या काही सत्रांमध्ये मजबूत बनलेल्या बाजारात घसरण झाली. तसेच चालू तिमाहीत काही कंपन्यांच्या कमकुवत मिळकत कामगिरीचा बाजारावर परिणाम झाला आहे. दरम्यान, गुंतवणूकदार अमेरिकेसोबत भारताच्या द्विपक्षीय व्यापार वाटाघाटींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. याबरोबरच, अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे, कारण नजीकच्या काळात व्याजदरात कपात अपेक्षित नाही, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
अणुऊर्जा प्रकल्प, लष्करी तळ, तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि धरणे यासारख्या संवेदनशील ठिकाणांसह देशभरात ३०० ठिकाणी हवाई हल्ल्याच्या चेतावणीचे भोंगे, युद्धासंबंधित नागरी प्रशिक्षण आणि खंदकांची साफसफाई आदींचा या युद्ध सरावांत समावेश केला जाणार आहे.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, इटर्नल, टाटा मोटर्स, स्टेट बँक, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, ॲक्सिस बँक आणि सन फार्मा या कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली. तर भारती एअरटेल, टाटा स्टील, महिंद्र अँड महिंद्र, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले आणि मारुती यांचे समभाग तेजीसह स्थिरावले. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ४९७.७९ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.
सेन्सेक्स ८०,६४१.०७ -१५५.७७ (-०.१९%)
निफ्टी २४,३७९.६० -८१.५५ (-०.३३%)
तेल ६१.८५ २.७६
डॉलर ८४.४५ १५ पैसे