मुंबई: अमेरिकेच्या वाढीव आयात कराची अंमलबजावणी सुरू होण्याची नजीक ठेपलेल्या अंतिम मुदतीबाबत सावधगिरी, बरोबरीने एचडीएफसी बँक, एल अँड टी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांत नफावसुली, परदेशी गुंतवणूकदारांचे विक्री करून बाहेर जाण्याचे नकारात्मक प्रतिबिंब बुधवारी भांडवली बाजारात उमटले. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक सुरुवातीच्या वाढीला पूर्णपणे गमावत घसरणीसह बंद झाले.

बाजारातून परदेशी भांडवलाचे पलायन आणि जागतिक शेअर बाजारातील संमिश्र कल याचाही गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम दिसून आला. त्यामुळे सेन्सेक्स दिवसअखेरीस २८७.६० अंशांनी (०.३४ टक्के) घसरून ८३,४०९.६९ वर बंद झाला. उत्साही सत्रारंभातून सेन्सेक्स ५४६.५२ अंशांनी झेपावला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८८.४० अंशांनी (०.३५ टक्के) घसरून २५,४५३.४० वर बंद झाला.

सेन्सेक्समधून, बजाज फिनसर्व्ह, लार्सन अँड टुब्रो, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि कोटक महिंद्र बँक हे प्रमुख समभाग पिछाडीवर होते. त्या उलट टाटा स्टील, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि ट्रेंट हे सर्वाधिक वाढणारे समभाग होते. सेन्सेक्समधील ३० पैकी १४ समभाग वधारले, तर १६ घसरणीत राहिले. निफ्टी निर्देशांकातील ५० समभागांपैकी २३ वधारले, तर २७ घसरणीत राहिले.

“जागतिक पातळीवर मिश्र संकेत, विशेषतः येणाऱ्या टॅरिफ डेडलाइनच्या आधी, गुंतवणूकदारांना सावध करत आहेत. बाजाराचे लक्ष हळूहळू पहिल्या तिमाहीतील महत्त्वाच्या उत्पन्नाकडे वळत आहे, ज्यांच्या अपेक्षा जास्त आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे, वाढलेला सरकारी भांडवली खर्च, जूनमध्ये १४ महिन्यांच्या उच्चांकी वाढ नोंदवणारी देशाच्या उत्पादन क्षेत्राची कामगिरी या गोष्टी बाजाराला आधार देणाऱ्या ठरल्या आहेत. तथापि, अलिकडच्या काळातील तेजीच्या प्रवाहात नफावसुलीही स्वाभाविक ठरते. त्यातच ट्रम्प यांच्या निर्णयासंबंधाने अनिश्चितता पाहता, सावधगिरी म्हणून किंचित घसरणीचा टप्पा बुधवारच्या सत्रात दिसून आला, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी मत नोंदविले.