लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात सलग चार सत्रांतील तेजीमुळे गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने सोमवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले. गेल्या चार सत्रात, सेन्सेक्सने २,१६२.११ अंशांची कमाई केली आणि तर निफ्टीमध्ये २.६६ टक्क्यांची वाढ होत ६६५.९ अंशांची भर पडली. परिणामी गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले.

दिवसभर नकारात्मक पातळीवर राहिल्यानंतर, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४५२.४४ अंशांनी घसरून ८३,६०६.४६ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ५७६.७७ गमावत ८३,४८२.१३ अंशांच्या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १२०.७५ अंशांची घसरण झाली आणि तो २५,५१७.०५ पातळीवर बंद झाला.

आखाती देशांमधील युद्ध जोखीम कमी झाल्यामुळे आणि अमेरिकेबरोबरच्या व्यापार कराराच्या वाढलेल्या आशावादामुळे जागतिक भांडवली बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, अलीकडील तेजीनंतर देशांतर्गत आघाडीवर निर्देशांकांमध्ये नफा-वसुली दिसून आली. गुंतवणूकदारांनी आता कंपन्यांच्या तिमाही आकडेवारीवर लक्ष केंद्रित केले आहे. बहुतांश कंपन्यांचे मूल्यांकन वाजवी पातळीवर असल्याने देशांतर्गत गुंतवणूकदारांनी समभाग खरेदी सुरू ठेवली आहे, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी ॲक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, भारती एअरटेल आणि एचडीएफसी बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर, ट्रेंट, स्टेट बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टायटन आणि बजाज फिनसर्व्ह यांची कामगिरी बाजार पडझडीतदेखील चमकदार राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) १,३९७.०२ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.

सेन्सेक्स ८३,६०६.४६ -४५२.४४

निफ्टी २५,५१७.०५ -१२०.७५

तेल ६७.६७ -०.१५%

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉलर ८५.७३ २३ पैसे