मुंबई : भू-राजकीय अनिश्चितता कायम असताना, अमेरिकेच्या संभाव्य शुल्कवाढीच्या वाढत्या चिंतांचे बाजारावर दाट छाया असल्याने, प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये शुक्रवारी सलग पाचव्या सत्रात विक्रीच्या दबावामुळे पुन्हा तब्बल १ टक्क्यांची घसरण झाली.
शुक्रवारी बाजारातील व्यवहार तेजीने सुरू झाले. पण ही तेजी अल्पजीवी ठरली आणि निर्देशांक ही गती कायम राखण्यास अयशस्वी ठरले. दिवसअखेरीस सेन्सेक्स ६०४.७२ अंशांनी, म्हणजेच ०.७२ टक्क्यांनी घसरून ८४,००० च्या पातळीच्या खाली आला आणि ८३,५७६.२४ पातळीवर स्थिरावला. दिवसादरम्यान, त्याने ७७८.६८ अंश गमावत ८३,४०२.२८ या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे निफ्टी १९३.५५ अंशांनी घसरून २५,६८३.३० पातळीवर बंद झाला. मागील पाच सत्रात मिळून सेन्सेक्सने जवळपास २,००० अंशांचे नुकसान सोसले आहे.
कमकुवत जागतिक संकेत, अमेरिकी रोख्यांवरील वाढते परतावा उत्पन्न आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्री याच्या एकत्रित परिणामांमुळे देशांतर्गत बाजार अजूनही घसरणीतून सावरलेले नाहीत. कंपन्यांच्या तिमाहीच्या उत्पन्नाबाबत सकारात्मक दृष्टिकोनाच्या भावनेचाही यातून घात झाला आहे.
अमेरिका-भारत व्यापार करारासंबंधी वाटाघाटींभोवती अनिश्चितता असताना, प्रत्यक्षात भारताच्या निर्यातीवर अधिक जबरी शुल्काचा तडाखा बसण्याचे संकेत आहेत. शिवाय वाढत्या भू-राजकीय तणावामुळे देशांतर्गत बाजारात जोखीम भावना तीव्र झाली आहे. देशांतर्गत विकास दर मजबूत राहण्याची अपेक्षा आहे आणि तिमाहीच्या निकालांमुळे मिडकॅप्सच्या नेतृत्वाखालील बाजारात उभारी दिसून येण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल, सन फार्मा आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक घसरले. तर एशियन पेंट्स, एचसीएल टेक, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी तेजी दर्शवली.
मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी ३,३६७.१२ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (डीआयआय) ३,७०१.१७ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शुल्कवाढीसंबंधीच्या नवीन विधानांनी जागतिक व्यापारातील अनिश्चिततेत भर घातली आहे. या चिंतांमुळे देशांतर्गत भांडवली बाजार संपूर्ण आठवडाभर निरंतर विक्रीच्या दबावाखाली राहिले, – पोनमुडी आर, मुख्याधिकारी, एनरिच मनी
