लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : अमेरिकेकडून होणारी संभाव्य शुल्कवाढ, परदेशी निधीचे निर्गमन आणि ब्लू-चिप कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेला विक्रीचा मारा यामुळे एका सत्रातील विश्रांतीनंतर मंगळवारी पुन्हा मंदीवाल्यांनी बाजाराचा ताबा घेतला. कंपन्यांकडून तिसऱ्या तिमाहीतील कामगिरी जाहीर होत असतानाच बाजारातील भावना कमकुवत झाल्या आहेत.
अस्थिर व्यवहारात, सेन्सेक्स २५०.४८ अंशांनी म्हणजेच ०.३० टक्क्यांनी घसरून ८३,६२७.६९ अंशांवर स्थिरावला. दिवसादरम्यान, त्याने ६१५.३८ अंश गमावून ८३,२६२.७९ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे निफ्टी ५७.९५ अंशांनी घसरून २५,७३२.३० पातळीवर बंद झाला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की, इराणशी व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही देशाला अमेरिकेसोबतच्या व्यापारावर २५ टक्के शुल्क भरावे लागेल, ज्यामुळे भारत, चीन आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या इराणच्या प्रमुख व्यापारी भागीदारांवर परिणाम होऊ शकतो. तात्काळ प्रभावाने, इराणसोबत व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही देशाला अमेरिकेशी केल्या जाणाऱ्या सर्व व्यवसायांवर २५ टक्के शुल्क भरावे लागेल. हा आदेश अंतिम आणि निर्णायक आहे, असे ट्रम्प यांनी सोमवारी समाजमाध्यमाद्वारे सूचित केले.
साप्ताहिक करार समाप्ती (एक्सपायरी) असल्याने देशांतर्गत भांडवली बाजारांमध्ये दिवसभर मोठी अस्थिरता दिसून आली. जागतिक शुल्काशी संबंधित चिंता, तिसऱ्या तिमाहीतील कंपन्यांची संमिश्र कामगिरी यामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात घसरण झाली, असे गुंतवणूक संस्था ‘एनरिच मनी’चे मुख्याधिकारी पोनमुडी आर यांनी सांगितले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी, ट्रेंट, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंटरग्लोब एव्हिएशन, मारुती, आयटीसी, अदानी पोर्ट्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्सचे समभाग सर्वाधिक घसरले. तर, इटर्नल, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्र, स्टेट बँक आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या समभागांनी बाजाराला सावरले. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी ३,६३८.४० कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (डीआयआय) ५,८३९.३२ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.
