मुंबई : अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने चार वर्षांहून अधिक कालावधींनंतर व्याजदर कपात केल्यांनतर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने सर्वोच पातळीला स्पर्श केला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २३६.५७ अंशांनी वधारून ८३,१८४.८० या सर्वकालीन उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ८२५.३८ अंशांची उसळी घेत ८३,७७३.६१ हे ऐतिहासिक शिखर गाठले होते. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३८.२५ अंशांची वाढ झाली आणि तो २५,४१५.८० पातळीवर स्थिरावला. त्याने देखील २५,६११.९५ या ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श केला.
‘फेड’ने अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे अर्ध्या टक्क्याची व्याजदर कपात केल्यानंतर भविष्यात देखील कपातीचे संकेत दिले. परिणामी निर्देशांकांनी विक्रमी उच्चांक गाठली. ५० आधार बिंदूंची दर कपात ही दबलेल्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी फेडची एक धाडसी भूमिका आहे. देशांतर्गत आघाडीवर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये नफावसुलीला प्राधान्य दिले आहे. बँकिंग आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये मात्र गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला. परकीय निधीचा वाढत्या ओघामुळे ऑक्टोबरमध्ये देखील या क्षेत्रांची कामगिरी चमकदार राहण्याची आशा आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : विधानसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?
सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी एनटीपीसी, नेस्ले, टायटन, कोटक महिंद्र बँक, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर, भारती एअरटेल आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग सर्वाधिक वधारले. तर एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, अदानी पोर्ट्स, लार्सन अँड टुब्रो, जेएसडब्ल्यू स्टील, स्टेट बँक, टेक महिंद्र आणि बजाज फायनान्सच्या समभागात घसरण झाली.
स्मॉलकॅप आणि मिडकॅपच्या समभागांना गळती
व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या वाढलेल्या मूल्यांकनामुळे गुंतवणूकदारांनी त्यात नफावसुलीला प्राधान्य दिले. परिणामी गुरुवारच्या सत्रात स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकात अनुक्रमे १.०६ टक्के आणि ०.५३ टक्क्यांची घसरण झाली. याबरोबरच दूरसंचार ३.८९ टक्के, तेल आणि वायू १.८१ टक्के, औद्योगिक १.५६ टक्के, सेवा १.२२ टक्के, टेक ०.६० टक्के आणि माहिती तंत्रज्ञान ०.४८ टक्के घसरण झाली.
हेही वाचा : भारत २०३१ पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था
सेन्सेक्स ८३,१८४.८० २३६.५७ ( ०.२९)
निफ्टी २५,४१५.८० ३८.२५ ( ०.१५)
डॉलर ८३.६६ -१०
तेल ७४.५४ १.२१