मुंबई : देशांतर्गत आघाडीवर तेजीवाल्यांनी बाजाराचा ताबा घेत प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीला उच्चांकी पातळीवर पोहोचवले. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा मोटर्समधील तेजीमुळे सेन्सेक्सने ८२ हजार अंशांच्या पाटलीपुढे झेप घेतली.
दिवसअखेर गुरुवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३४९.०५ टक्क्यांनी वधारून ८२,१३४.६१ या सर्वोच्च उच्चांकी पातळीवर स्थिरावला. सलग आठव्या सत्रात सेन्सेक्स सकारात्मक पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ५००.२७ अंशांची कमाई करत ८२,२८५.९५ हे शिखर गाठले होते. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ९९.६० अंशांची कमाई करत २५,१५१.९५ ही विक्रमी पातळी गाठली. सत्रादरम्यान त्याने २५,१९२.९० या ऐतिहासिक पातळीला स्पर्श केला होता.
हेही वाचा >>> Gold-Silver Price: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांना धक्का! जाणून घ्या मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत
देशांतर्गत आघाडीवर प्रमुख निर्देशांकांनी स्थिरपणे व्यवहाराला सुरुवात केली. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील (एजीएम) घोषणांच्या उत्सुकतेपोटी दुपारच्या सत्रात बाजारात अस्थिरता वाढली. मात्र दिवसअखेरीस वेगाने सुधारणा होऊन निर्देशांक नवीन उच्चांकावर पोहोचले. अलीकडेच भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि ग्राहकोपयोगी वस्तू समभागातील वाढ अमेरिकी अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे आणि देशांतर्गत ग्रामीण उपभोगात सुधारणा होत आल्याचे दर्शवत आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर व्यक्त केले.
हेही वाचा >>> ‘यूपीआय – रूपे’च्या जागतिकीकरणावर रिझर्व्ह बँकेचा भर
सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये टाटा मोटर्सने ४ टक्क्यांहून अधिक झेप घेतली, त्यापाठोपाठ बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्र, मारुती आणि स्टेट बँक यांचे समभाग तेजीसह स्थिरावले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी कंपनीची १:१ (एकास एक) बक्षीस समभाग देण्याची योजना असल्याची घोषणा केल्यांनतर रिलायन्सच्या समभागाने २ टक्क्यांची उसळी घेतली. दुसरीकडे महिंद्र अँड महिंद्र, सन फार्मा, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक महिंद्र बँक, इन्फोसिस आणि टाटा स्टील यांचे समभाग पिछाडीवर होते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारच्या सत्रात १,३४७.५३ कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्री केले.
रिलायन्सच्या बाजारभांडवलात ४२ हजार कोटींची भर
रिलायन्स इंडस्ट्रीज बक्षीस समभाग देण्याची योजना असून त्यासाठी ५ सप्टेंबररोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या घोषणेनंतर गुरुवारी दुपारच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने सुमारे ३ टक्क्यांची उसळी घेतली होती. दिवसअखेर समभाग १.५१ टक्क्यांनी वधारून ३,०४१.८५ रुपयांवर बंद झाला. परिणामी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल एका सत्रात ४२,३९९.२४ कोटी रुपयांनी वधारून २०.६० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याआधी रिलायन्स सप्टेंबर २०१७ मध्ये बक्षीस समभाग दिले होते.
सेन्सेक्स ८२,१३४.६१ ३४९.०५ (०.४३%)
निफ्टी २५,१५१.९५ ९९.६० (०.४०%)
डॉलर ८३.८७ -१० पैसे
तेल ७८.२७ -०.६०