मुंबई : देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर कायम राखल्याने मावळलेल्या २०२५ च्या अखेरच्या सत्रात बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांनी सुमारे १ टक्क्यांनी वधारले. या वर्षात सेन्सेक्सने ७,०८१.५९ अंशांची म्हणजेच ९ टक्क्यांची कमाई केली. तर निफ्टीने २,४८४.८ अंशांची म्हणजेच १०.५० टक्क्यांची भर घातली आहे.

सलग पाच सत्रातील घसरणीनंतर भांडवली बाजाराने वर्षातील अंतिम सत्राचा सकारात्मक समारोप केला. सेन्सेक्स ५४५.५२ अंशांनी म्हणजेच ०.६४ टक्क्यांनी वधारून ८५,२२०.६० पातळीवर स्थिरावला. सत्रादरम्यान, त्याने ७६२.०९ अंशांची उसळी घेत ८५,४३७.१७ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. तर चार दिवसांच्या घसरणीनंतर, निफ्टी १९०.७५ अंशांनी, म्हणजेच ०.७४ टक्क्यांनी वधारून २६,१२९.६० पातळीवर बंद झाला.

बाजाराने २०२५ वर्षाची सांगता तेजीसह केली. सर्वच क्षेत्रांमध्ये व्यापक वाढ दिसून आली. पुढे पाहता, मागणीच्या परिस्थितीत सुधारणा होत असल्यामुळे, विद्यमान कॅलेंडर वर्ष २०२६ मध्ये बाजारात सकारात्मक तेजीचे वातावरण राहिल, अशी अपेक्षा वाढली आहे. गुंतवणूकदारांची भावना कंपन्यांच्या नफ्यावर आणि सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) संभाव्य वाढीवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे.

सरकारने पोलाद उत्पादनांवर आयात शुल्क जाहीर केल्यानंतर धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. दरम्यान, स्थिर मागणीची अपेक्षा आणि मजबूत रिफायनिंग मार्जिनमुळे तेल आणि वायू क्षेत्राने उत्कृष्ट कामगिरी केली, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी, टाटा स्टील, कोटक महिंद्र बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, ॲक्सिस बँक, टायटन आणि ट्रेंट यांचे समभाग तेजीत होते. मात्र टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्र, इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि सन फार्मा यांची कामगिरी निराशाजनक राहिली.

२०२५ मधील कामगिरीचा वेध

  • सेन्सेक्स: ८५,२२०.६० वाढ ७,०८१.५९ अंश (९%)
  • निफ्टी: २६,१२९.६० वाढ २,४८४.८० अंश (१०.५%)
  • सोने (१० ग्रॅम): १,३५,८८० रु. (७४.५%)
  • चांदी (प्रति किलो): २,४१,००० रु. (१५५%)
  • रुपया: ८९.८८ घसरण ४२४ पैसे (-४.९५%)

(२४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत. सरलेल्या २६ डिसेंबर २०२५ रोजी चांदीने २,६२,००० रुपयांचा, तर सोन्याने १,४२,३०० रुपयांचा विक्रमी उच्चांक स्थापित केलेला आहे.)