मुंबई: वाढता भू-राजकीय तणाव आणि माहिती तंत्रज्ञान, उपभोग्य वस्तू आणि निवडक बँकिंग क्षेत्रातील ब्लू-चिप समभागांमधील घसरणीमुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी घसरले. यामुळे सलग दोन सत्रात मिळून सेन्सेक्स ५०० अंशांनी घसरला आहे. परदेशी निधीचे सततचे निर्गमन आणि नवीन आयात शुल्कासंबंधित अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सेन्सेक्स २४४.९८ अंशांनी, म्हणजेच ०.२९ टक्क्यांनी घसरून ८३,३८२.७१ पातळीवर स्थिरावला. दिवसादरम्यान, त्याने ४४२.४९ अंश गमावत ८३,१८५.२० या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे निफ्टी ६६.७० अंशांनी २५,६६५.६० पातळीवर बंद झाला.

भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतच्या अनिश्चिततेमुळे देशांतर्गत बाजारपेठांमध्ये सावधगिरीचे वातावरण कायम आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार जोखीम पत्करण्यास तयार नसून हात राखून व्यवहार करण्याकडे त्यांचा कल दिसून येत आहे. तथापि, अमेरिकेशी व्यापार करारावर या आठवड्यात वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्याने नवीन आशा निर्माण झाल्या आहेत. अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या अपेक्षेने रोख्यांच्या किमती वाढण्यासह धातू क्षेत्रातील समभागांमध्ये तेजी दिसून आली. नियंत्रित महागाई आणि भू-राजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढता कल यासाठी कारणीभूत आहे. स्थानिक स्तरावर मिडकॅप आणि स्मॉलकॅप क्षेत्रातील कंपन्यांमध्ये निवडक खरेदी झाल्यामुळे व्यापक बाजारपेठेनी चांगली कामगिरी केली. गुंतवणूकदार प्रमुख बँकांच्या कमाईच्या निकालांची वाट पाहत असल्याने इक्विटी बाजारात संमिश्र व्यवहार झाले, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एशियन पेंट्स, मारुती, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्र बँक, टेक महिंद्र, एचडीएफसी बँक आणि लार्सन अँड टुब्रो या समभागांमध्ये घसरण झाली. तर दुसरीकडे, टाटा स्टील, एनटीपीसी, ॲक्सिस बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या समभागांनी निर्देशांकांना मोठ्या घसरणीतून सावरण्यास हातभार लावला. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी १,४९९.८१ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी १,१८१.७८ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.