पीटीआय, नवी दिल्ली
नवीन कार्यादेशातील वाढीमुळे देशाच्या सेवा क्षेत्राची सक्रियता सरलेल्या एप्रिलमध्ये वाढली असून, रोजगारातही परिणामी जलद वाढ झाल्याचे बुधवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणाने स्पष्ट केले.
भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक एप्रिल महिन्यात ५८.७ गुणांवर नोंदला गेला. मार्चमध्ये हा गुणांक ५८.५ गुणांवर होता. सेवा क्षेत्राचा निर्देशांक हा त्याच्या दीर्घकालीन सरासरी ५४.२ पेक्षा अधिक राहिला आहे. उत्पादकता आणि कार्यादेशातील सकारात्मक वाढ यामुळे एप्रिल महिन्यात सेवा क्षेत्राचा विस्तार झाला आहे. सेवा क्षेत्राचा निर्देशांक ५० गुणांवर नोंदला गेल्यास विस्तार तर ५० गुणांखाली नोंदला गेल्यास आकुंचन झाल्याचे मानले जाते. सेवा क्षेत्रातील महागाईचा दर गेल्या महिन्यात मध्यम राहिला.
मार्चमध्ये गती काहीशी कमी झाल्यानंतर नवीन निर्यात कार्यादेशामुळे एप्रिल महिन्यात सेवा क्षेत्राने वेग धरला आहे. जुलै २०२४ नंतर सर्वाधिक जलद गतीने साधलेली ही वाढ आहे, असे एचएसबीसीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाल्या. नवीन व्यवसायांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे उत्पादनातील एकूण विस्ताराला चालना मिळाली, अनेक कंपन्यांनी अनुकूल मागणी परिस्थिती आणि यशस्वी विपणन प्रयत्नांच्या जोरावर ही वाढ साधली आहे. शिवाय, भारतीय कंपन्यांना त्यांच्या सेवांसाठी आशिया खंडातील देश, युरोप, आखाती देश आणि अमेरिका यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कार्यादेश प्राप्त झाले आहे. एकूणच, जुलै २०२४ पासून नवीन निर्यात कार्यादेश सर्वात जलद गतीने वाढले आहेत. यामुळे भविष्यातील व्यवसाय वाढीबाबत सकारात्मकता दिसून येत आहे.
नवीन कार्यादेशामुळे भारतीय सेवा कंपन्यांनी एप्रिलमध्ये सलग पस्तीसाव्या महिन्यात त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे. ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पूर्णवेळ आणि अर्धवेळ कर्मचाऱ्यांसह कार्यक्षमता वाढवली, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. किंमतीच्या आघाडीवर, भारतीय सेवा कंपन्यांनी एप्रिलमध्ये त्यांच्या सरासरी विक्री किमती वाढवल्या, कारण त्यांनी ग्राहकांना जास्त खर्चाचा भार हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला. खर्चाचा दबाव कमी झाल्यामुळे आणि आकारलेल्या किंमती जलद गतीने वाढल्यामुळे कंपन्यांच्या महसुलात सुधारणा झाली आहे.दरम्यान, देशातील निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा एचएसबीसी इंडियाचा संयुक्त पीएमआय निर्देशांक एप्रिलमध्ये ५९.७ गुणांवर नोंदविला गेला. मार्चच्या तुलनेत त्यात किरकोळ वाढ झाली आहे.
सेवा पीएमआय म्हणजे काय?
सेवा पीएमआय (खरेदी व्यवस्थापक निर्देशांक) हा एक निर्देशक आहे, जो सेवा क्षेत्राच्या कामगिरी आणि आर्थिक आरोग्याची अंतर्दृष्टी प्रदान करतो. निर्देशांक विक्री, रोजगार पातळी, इन्व्हेंटरी व्यवस्थापन आणि किंमतींसह सेवा उद्योगातील प्रमुख चलांचा मागोवा ठेवतो. निर्देशांक गुंतवणूकदार, अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांना सध्याच्या व्यवसाय परिस्थिती समजून घेण्यास मदत करतो.