नवी दिल्लीः सकारात्मक मागणीचा प्रवाह आणि देशी तसेच आंतरराष्ट्रीय विक्रीत सतत सुधारणा झाल्यामुळे देशाच्या सेवा क्षेत्राची वाढ जूनमध्ये दहा महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली, असे मासिक सर्वेक्षणातून गुरुवारी पुढे आले.
नवीन व्यवसायांच्या कार्यादेशांमध्ये तीव्र वाढ झाल्यामुळे एचएसबीसी इंडियाच्या सेवा क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांच्या सर्वेक्षणावर आधारीत व्यावसायिक क्रिया पीएमआय निर्देशांक मे महिन्यातील ५८.८ गुणांवरून, जूनमध्ये ६०.४ गुणांवर पोहोचला. पीएमआयच्या परिभाषेत, ५० पेक्षा जास्त गुण हे विस्तारदर्शक, तर ५० पेक्षा कमी गुण म्हणजे आकुंचन दर्शवितात.
नवीन देशांतर्गत आणि आंतराष्ट्रीय कार्यादेशांमध्ये तीव्र वाढ झाल्यामुळे सेवा पीएमआय निर्देशांक दहा महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. निर्यात कार्यादेशांमध्ये वाढ जरी झाली, तरी ती मंद गतीने झाली आहे. बरोबरीने कच्च्या मालाच्या खर्चात वाढ असली उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने कंपन्याच्या नफाक्षमतेतही वाढ दिसून आली, असे एचएसबीसीच्या भारतातील मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाल्या.
ऑगस्ट २०२४ पासून नवीन ऑर्डर्स सर्वात जलद गतीने वाढ सुरू आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील मजबूत स्थिती आणि नवीन निर्यात व्यवसायात लक्षणीय वाढ झाल्यामुळे सेवा कंपन्यांना या काळात सर्वाधिक फायदा झाला. विशेषतः आशियाई, आखाती देश आणि अमेरिकी बाजारपेठेतून परदेशी मागणीतील लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे.
दरम्यान, एचएसबीसी इंडियाचा संयुक्त पीएमआय निर्देशांक मे महिन्यातील ५९.३ वरून जूनमध्ये ६१ वर पोहोचला, जो १४ महिन्यांतील सर्वात जलद विस्तार दर दर्शवितो. दोन दिवसांपूर्वी देशाच्या उत्पादन क्षेत्रातील उत्साही सक्रियता दर्शविणारा पीएमआय निर्देशांक ५८.४ गुणांवर म्हणजे १४ महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर नोंदविला गेला आहे.
रोजगारात मोठी वाढ
भारतीय सेवा क्षेत्राच्या सातत्यपूर्ण विस्ताराचा नवीन नोकर भरतीवर सकारात्मक परिणाम दिसला आहे. जूनमध्ये सलग ३७ व्या महिन्यात रोजगारात वाढ झाली. इतकेच नव्हे तर, मे महिन्याच्या विक्रमी पातळीपेक्षा कमी असूनही, रोजगारवाढीचा जूनमधील दर दीर्घकालीन सरासरीपेक्षा जास्त होता.